बेंगळुरू – इंडियन प्रिमियर लीगमधील सामना खेळताना जखमी झालेला भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि उपकर्णधार रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी आपण तयार असून त्यासाठी काही काळ विश्रांती घेणे आवश्यक असण्यावर भर दिला आहे. खेळाडूंच्या जीवनात दुखापती या येतच असतात आणि त्यांचा सामना करतच कारकीर्द घडवावी लागत असली, तरी आपली सध्याची दुखापत अजिबात गंभीर नसल्याचेही रोहितने सांगितले आहे.
रोहितच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचे मागचे स्नायू दुखावले गेले आहेत. याला हॅमस्ट्रींग मसल्स असे म्हणतात. धावण्याची जास्तीत जास्त गरज असलेल्या टेनिस, क्रिकेट, ऍथलेटिक्स आणि फुटबॉलसारख्या खेळात या स्नायूंवर सर्वाधिक ताण येत असतो. त्यामुळे हे स्नायू दुखावले तर खेळाडूला बरा होण्यासाठी अधिक काळ द्यावा लागतो.
रोहित म्हणाला की, मी सुरुवातीपासूनच सांगतो आहे की, माझी दुखापत तितकीशी गंभीर नाही; जितकी त्यावर माध्यमांत चर्चा होते आहे. माझी प्रकृती, उपचार आणि बरे होण्यातील प्रगती याविषयीची मी सातत्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाला कळवत आहे. अन्यथा आयपीएलच्या अंतिम सामन्यात 50 चेंडूत 68 धावांची खेळी मला साकारता आलीच नसती.
ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी रोहित सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार घेत असून फिटनेसविषयीच्या विविध चाचण्यांमधूनही जात आहे. वीस षटकांचे सामने खेळणे निराळे आणि पाच दिवसांचे कसोटी सामने खेळणे निराळे असले तरी, माझ्या मते माझी मानसिकता आणि इच्छाशक्ती एवढी प्रबळ आहे की, क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारांत सर्वस्व ओतून खेळ करण्याची महत्त्वाकांक्षा मी बाळगून आहे, असे रोहित म्हणाला.
ऑस्ट्रेलिया दौरा नेहमीच आव्हानात्मक असतो आणि प्रत्येक खेळाडूला त्यासाठी विशेष परिश्रमही घ्यावे लागतात, हे सर्वजण जाणतात. तरीही काही जण माझ्या फिटनेसविषयी नकारात्मक माहिती पसरवत आहेत; ज्याची मी फिकीर करत नाही, असे सांगून रोहित पुढे म्हणाला की, कसोटी मालिका वास्तविक 17 डिसेंबरला सुरू होत असताना, मला आणखी तीन आठवडे विश्रांतीसाठी मिळत आहेत. इतकी विश्रांती आणि उपचार घेतल्यावर मी अनफिट असेन कसा, असा प्रतिप्रश्नही रोहितने केला आहे.
माझ्या दुखापतीविषयी नकारात्मक माहिती पसरवत असलेल्यांना मी प्रत्त्युत्तर देऊ इच्छित नाही. माझी कामगिरीच या सर्व शंका-कुशंकांचे उत्तर असेल, असेही रोहितने वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत शेवटी सांगितले.