#WBBL : मिशेल स्टार्कची पत्नी अलायसाचे वादळी शतक

सिडनी संघाचा मेलबर्नवर 5 गडी राखून विजय

सिडनी – ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिलांच्या बिग बॅश लीग स्पर्धेत दिग्गज खेळाडू अलायसा हिलीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत शतकी खेळी केली. अलायसा हिली ही ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कची पत्नी आहे. पती आणि पत्नी देशाच्या राष्ट्रीय संघांचं प्रतिनिधित्व करण्याचे ही क्रिकेटच्या इतिहासातील पहिलीच घटना असावी. 

सिडनी सिक्‍सर्सकडून खेळणाऱ्या हिलीने मेलबर्नविरुद्ध सामन्यात खेळताना मैदानात चौफेर फटकेबाजी करत 48 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. अवघ्या 52 चेंडूत 111 धावांची खेळी करणाऱ्या हिलीने मैदानात 15 चौकार आणि 6 खणखणीत षटकार ठोकले. म्हणजे तिच्या 96 धावा या चौकार-षटकारानेच आल्या. हिलीच्या या शतकी खेळीच्या जोरावर सिडनी संघाने मेलबर्नवर 5 गडी राखून विजय मिळवला.

आपल्या पत्नीची खेळी पाहण्यासाठी मिशेल स्टार्क स्टेडियमवर उपस्थित होता. हिलीने चौकार लगावत शतक पूर्ण केल्यानंतर स्टार्कनेही टाळ्या वाजवत पत्नीचं कौतुक केलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एप्रिल 2016 मध्ये मिशेल स्टार्क आणि हिली यांचा विवाहसोहळा पार पडला. मिशेल स्टार्क हा आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तर अलायसा हिली ही यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून खेळते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.