भाजपने आपली दारे पूर्णपणे उघडली तर विरोधक दिसणार नाहीत

भाजप अध्यक्ष अमित शहा यांची विरोधकांवर टीका

सोलापूर : महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांमधून भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांची यादी वाढत चालली आहे. या पक्षांतरावरूनभाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला लक्ष्य करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. तर विरोधकांवर टीकास्त्र उगारले. यावेळी त्यांनी भाजपने आपली दारे पूर्णपणे उघडली तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कुणीच शिल्लक राहणार नाही, अशी टीका शहा यांनी केली. भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा सोलापूरमध्ये समारोप झाला त्यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली.

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कारभाराचा हिशेब जनतेसमोर मांडण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्यात आली आहे. हिंमत असेल तर शरद पवार यांनी याआधी अनेक वर्षे राज्यात केलेल्या कारभाराचा हिशेब द्यावा, असे आव्हान शहा यांनी पवार यांना दिले. शरद पवार आणि राहुल गांधी यांनी कलम 370 बाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही शहा म्हणाले. मोदींच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांत फडणवीस यांनी उद्योग, गुंतवणूक , रोजगार आदी सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला प्रथम स्थानावर आणले आहे, असेही शहा यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.