शहर विरुद्ध ग्रामीण वाद पेटणार

– राजेंद्र काळभोर

लोणी काळभोर – एकीकडे हवेली, दौंड, इंदापूर तालुक्‍यांतील नागरिक आणि शेतकरी पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी टाहो फोडत असताना प्रशासन बधत नाही. त्यातच पुणे शहरातील नागरिकांना पिण्यासाठी 18 टीएमसी पाणी मंजूर करावे, अशी मागणी शहर कॉंग्रेसने केली आहे, त्यामुळे तीन तालुक्‍यांत संतापाची लाट उसळली आहे. आगामी काळात शहर विरुद्ध जिल्हा असे जलयुद्ध पेटण्याची दाट शक्‍यता आहे.

खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर ही चार धरणे पुणे शहराला पिण्यासाठी व जिल्ह्यातील हवेली, दौंड व इंदापूर तालुक्‍यांतील जनतेला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा पुरवतात. या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी पुणे शहराची लोकसंख्या कमी होती, त्यावेळी पुणे शहराची तहान साडेपाच टीएमसी पाण्यावर भागत होती. यानंतर लोकसंख्या वाढली, त्यामुळे तत्कालीन राज्य सरकारचा जलसंपदा विभाग व पुणे महानगरपालिका यांच्यात नवीन करार करण्यात आला. त्यानुसार पहिले मंजूर असलेले साडेपाच टीएमसी पाणी व अधिक सहा टीएमसी पाणी, असे एकूण साडेअकरा टीएमसी पाणी पुणे शहरासाठी मंजूर करण्यात आले.

मात्र, वाढीव सहा टीएमसी पाण्यावर प्रक्रिया व ते शुद्ध करून जुन्या कालव्यात शेतीसाठी सोडायचे, असे करारात ठरले होते. महानगरपालिकेच्या लालफितीच्या व दप्तर दिरंगाईच्या कारभाराने हे शुद्ध केलेले पाणी शेतीला मिळायला शेतकऱ्यांना 15 ते 20 वर्षे वाट पाहावी लागली. इंदापूर तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका ही दाखल केली आहे. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे ही हवेली, दौंड व इंदापूर तालुक्‍यातील शेतीच्या पाण्यासाठी बांधण्यात आली आहेत, असा दावा या तीनही तालुक्‍यांतील शेतकरी करीत आहेत.

4 टीएमसी पाणी 3 तालुक्‍यांना कसे पुरणार?
अभ्यासू शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. त्यातील अंदाजे 2 ते 3 टीएमसी पाणी बाष्पीभवनाद्वारे उडून जाते. 18 टीएमसी पाणी जर पुणे शहराला मंजूर केले, तर सत्तेच्या बळावर महानगरपालिका 21 ते 22 टीएमसी पाणी धरणातून उचलू शकते. कारण सध्या फक्‍त साडेअकरा टीएमसी पाणी मंजूर असताना महानगरपालिका तब्बल 15 टीएमसी पाणी जबरदस्तीने उचलत आहे. मग 22 टीएमसी पाणी महानगरपालिकेने उचलल्यास उर्वरित 4 टीएमसी पाणी हवेली, दौंड व इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी ही पुरणार नाही. त्यामुळे या तीन तालुक्‍यांतील 66 हजार हेक्‍टर शेती वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही.

पुणे शहराला खडकवासला धरण साखळीतील पाणी वाढवून देऊन हवेली, दौंड व इंदापूर तालुक्‍यांतील शेतीचे पाणी कमी करण्याचा हा डाव आहे. असा प्रयत्न झाल्यास शिवसेनच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल, हे संबंधित प्रशासनाने ध्यानात घ्यावे.
– प्रशांत काळभोर, शिवसेना नेते, हवेली तालुका

Leave A Reply

Your email address will not be published.