पौड – सूस ग्रामपंचायतीच्या मागील ग्रामसभेतील ठरावांवर काम न झाल्याने येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेवरच बहिष्कार घातला आहे. याशिवाय नियमबाह्य खर्चाची जिल्हा परिषदेकडून चौकशी करण्याची जोरदार मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे.
मुळशी तालुक्यातील दिग्गज नेत्यांचे गाव समजल्या जाणाऱ्या सुस ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच अपूर्वा निकाळजे सभेच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 30 ऑगस्ट) आयोजित करण्यात आली होती. सचिव म्हणून मुख्याध्यापक गावडे यांची नेमणूक केलेली होती. यावेळी महत्त्वाच्या विविध विषयावर चर्चा होणार असल्याने 50 ते 60 ग्रामस्थ उपस्थित असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. मुख्याध्यापकांना मागील सभेत झालेल्या कामकाजाची माहिती नाही व ग्रामस्थांच्या प्रलंबित प्रश्नांवर ग्रामपंचायतीने काम केलेले नसल्याने आम्ही सह्या करणार नसल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी मागणी करूनही लोकांच्या शेतीच्या व कामाच्या वेळेला ग्रामसभा आयोजित करून सरपंच व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत नियमांचा भंग केला असल्याचा आरोप करण्यात आला.
मागील ग्रामसभेचे इतिवृत्तांत चुकीच्या पद्धतीने लिहिले गेल्याची तक्रार ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे केली होती. चुकीचे इतिवृत्त दुरुस्त करून घेतले का ? असा प्रश्न विचारला असता सरपंचांनी नकारार्थी उत्तर दिले. आर्थिक वर्ष 2018-2019 च्या वार्षिक जमाखर्चामधील अनेक नियमबाह्य व चुकीच्या खर्चाला ग्रामसभेत आक्षेप घेत ग्रामस्थांनी वार्षिक जमाखर्चाला मान्यता दिलेली नव्हती. या खर्चाची जिल्हा परिषदेकडून चौकशी करण्याची मागणी केलेली होती. जिल्हा परिषदेचा चौकशी अहवाल आला का ? या प्रश्नावर देखील नकारार्थी उत्तर दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
याशिवाय 2019-2020 या वर्षांकरीता तंटामुक्ती कमिटी अध्यक्ष निवड हा विषय ग्रामसभेच्या विषयपत्रिकेवर घ्यावा, असे पंचायत समितीचे पत्र असताना देखील सरपंचांनी या विषय सभेच्या विषयपत्रिकेवर का घेतला नाही. अशी विविध प्रश्न निर्माण केले. मात्र, यावर समाधानकारक उत्तर मिळू न शकल्याने अखेर ग्रामस्थांनी ग्रामसभेवर बहिष्कार घातला. यावेळी कोरम पूर्ण होऊ शकला नसल्याने सरपंचांनी ग्रामसभा तहकूब केली. ग्रामसभेत ग्रामस्थांचा कोरम पूर्ण न झाल्याने सभाच तहकूब झाली. त्यामुळे बहिष्कार घालण्याचा प्रश्नच येत नाही.
– अपूर्वा निकाळजे सरपंच, सूस ग्रामपंचायत