पुणे – केंद्र शासनाकडून राज्यात ई-पास रद्द करण्याच्या सूचना केल्या असल्या, तरी राज्यातील करोनाची स्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच ई-पास रद्द करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पुण्यात स्पष्ट केले.
शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानावर करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या 800 बेड्सच्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.