केडगाव -दौंड तालुक्यातील दापोडी या ठिकाणी चंदन तस्करांकडून दोन लाख रूपये किमतीचा चंदनाचा साठा जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. रामदास शहाजी माने (वय 25, रा. मुर्टी, ता. बारामती), राजू बाबू शिंदे (वय 30, रा. दापोडी, ता. दौंड) या दोन आरोपींना अटक केली आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली महेश गायकवाड, गुरु गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत यांच्या पथकाने केली आहे. शनिवारी केडगाव नजीकच्या दापोडी गावच्या हद्दीत टोलनाका परिसरात पेट्रोलिंग करीत असताना देशमुखवस्ती येथील देवई तरकारी सेंटर येथे दोघे रमेश करडे यास चंदन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार या पथकाने केडगाव पोलीस चौकीचे पोलीस हवालदार बापू बंडगर, जितेंद्र पानसरे यांच्या मदतीने सापळा रचून छापा टाकला व विक्री करणाऱ्या दोघांना मोटार सायकलसह अटक केली. माल घेणारा रमेश करडे चंदनाच्या लाकडाचे पोते टाकून पसार झाला. दोन आरोपी व त्यांच्याकडील दुचाकी (एमएच 42 एझेड 2513), रोख रक्कम 18 हजार 500, दोन मोबाईल व 1 लाख 54 हजार रुपयांची चंदनाची 22 किलो वजनाची लाकडे असा एकूण 2 लाख 20 हजार 500 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
तिघा आरोपींवर भारतीय वन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यातील फरारी आरोपी रमेश करडे यास बोलेरो जीपसह फेब्रुवारी 2018 मध्ये चंदनतस्करी करताना अटक करून त्याच्याकडून 8 लाख 64 हजार रुपय जप्त करण्यात आले होते. याबाबत अधिक तपास केडगावचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे पोलीस नाईक बाळासो चोरमले करीत आहेत.
या टोळीने पुणे बारामती खडकवासला परिसरात चंदन चोरी केली आहे. या कामात मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास सुरु करण्यात आला आहे.