बंडावर घेतले तोंडसुख : खिल्ली उडवणारे व्हिडिओ, फोटो व्हायरल
सासवड – राजभवनात शनिवारी (दि. 23) सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाची शपथविधी हा मोठा धक्का महाराष्ट्रातील जनतेला अनुभवास मिळाले. सकाळच्या या माहाभूकंपाने संपूर्ण राज्यातील राजकीय सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवली प्रसारमाध्यमांनाही बुचकळ्यात टाकणारा हा प्रकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला असून अजित पवारांच्या “बंडाळी’वर नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केले आहे.
अजित पवार यांची खिल्ली उडवणाऱ्या हजारो पोस्ट काही तासात सोशल मीडियावर “व्हायरल’ केलेल्या. अजित पवारांचे एडीट केलेले फोटो, व्हिडिओ यातून नेटिझन्सनी आपला राग, संताप व्यक्त केला अजित पवार यांनी काही वर्षांपूर्वी धरणाच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानावेळी सोशल मीडिया एवढ्या प्रमाणात पसरलेला नव्हता;मात्र आज पवार प्रचंड “ट्रोल’ झाले असून एकप्रकारे सर्वच पक्ष आणि 288 आमदारांकडून लोकशाहीची थट्टाच सुरू असल्याचे सूर नेटिझन्सने आळवला आहे.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नेटिझन्स सतर्क असतात आणि जागतिक पातळीवरील होणारी छोटीशी घटना देखील नेककऱ्यांना पोस्ट करण्यास प्रवृत्त करते. आज अजित पवारांचे बंड हा महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा भूकंप मानण्यात आला. त्यामुळे यावर नेटिझन्स गप्प बसणे शक्यच नव्हते .
अजित पवारांच्या बंडखोरीला नकारात्मक प्रतिसाद देत नेटिझन्सने अजित पवारांवर टीकेची झोड उठवत एडीट केलेले विविध प्रकारचे फोटो, व्हिडिओ टाकण्याचा सपाटाच आज सकाळपसून सुरू केला. यामध्ये काही नेटीझन्सने तर अतिशय खालच्या पातळीवरती अजित पवारांवर टीका केली. थोडक्यात अजित पवारांच्या बंडाची भूमिका ही नेटिझन्सला रुचलेली नसल्याचे यातून प्रदर्शित होत आहे.