पुणे (अविनाश ढगे) -पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) “पुणे दर्शन’ बसमध्ये आजपासून प्रायोगिक तत्वावर ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू होणार असून, पुढील 15 दिवसांत सर्वच बसमध्ये तिकिटासाठी ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.
केंद्र सरकारकडून डिजिटल इंडियाच्या माध्यमातून डिजिटल व्यवहाराला प्रोत्सहान दिले जात आहे. सर्वच ठिकाणी ऑनलाइन व्यवहार करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. एअरपोर्ट, रेल्वे, एसटी आणि मेट्रो रेल्वे या सर्वच ठिकाणी ऑनलाईन पेमेंन्ट सुविधा दिली जाते, तसेच मुंबईची प्रादेशिक परिवहन संस्था बेस्ट मध्ये देखील ऑनलाइन सुविधा सुरू झाली असताना पीएमपीमध्ये ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. पीएमपीचे नवनिर्वाचित व्यवस्थापक संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी पदभार स्वीकारताच सर्व बसमध्ये ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पीएमपी प्रशासनाने पुणे दर्शनच्या दोन बसमध्ये प्रायोगित तत्वावर ऑनलाइन पेमेंट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बसमध्ये क्युआर कोड लावण्यात येणार आहेत. प्रवाशांना हा कोड स्कॅन करून “गुगल पे’ किंवा “फोन पे’ने तिकिटाचे पैसे जमा करता येतील. पुढील पंधरा दिवसांमध्ये सर्वच बसमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या सेवेमुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच बसमध्ये सुट्ट्या पैशांसाठी प्रवाशांचे वाहकांबरोबर वारंवार होणारे वाद कमी होतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
नागरिकांच्या सुरक्षित, सक्षम आणि जलद प्रवासासाठी पीएमपीकडून विविध पावले उचलली जात आहेत. पीएमपीमध्ये आधुनिक उपाययोजना करून प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यास प्राधान्य दिले जाणार आहत. ऑनलाइन पेमेंट सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
-ओमप्रकाश बकोरिया, व्यवस्थापकीय संचालक
पीएमपीची सद्यस्थिती
एकूण बस 2 हजार 142
स्वमालकीच्या – 1012
भाडेतत्त्वावरील – 1130
सीएनजी बस – 1594
डिझेल – 150
इलेक्ट्रिक – 398