पुणे-महापालिकेच्या स्थायी समितीलाही मागे टाकत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी करोना संकटानंतरही पालिकेचे उत्पन्न विक्रमी स्वरुपात वाढेल, असा अंदाज गृहीत धरत तब्बल 8 हजार 592 कोटींचे अंदाजपत्रक 2022-23 या आर्थिक वर्षासाठी मांडले आहे. मात्र, आयुक्तांच्या अंदाजाचा डोलारा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत कोसळला असून, 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 या पहिल्या सहामाहित महापालिकेचे उत्पन्न घटले आहे. दुसऱ्या बाजूला मात्र, सातवा वेतन आयोग तसेच मोठ्या प्रकल्पांमुळे भांडवली खर्चही वाढला असल्याचे समोर आले आहे.
या सहा महिन्यांत महापालिकेस 3,300 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर पगार, देखभाल-दुरुस्ती आणि प्रकल्पांच्या कामासाठी 2,323 कोटी रुपयांचा खर्च झाला. सातव्या वेतन आयोगामुळे वाढलेला पगार, वेतन आयोगाचा फरक यांसह एकाच वेळी अनेक मोठे प्रकल्प सुरू असल्याने हा खर्च वाढला आहे. तर मागील वर्षी (2021-22) मध्ये पहिल्या सहा महिन्यांत महसुली आणि भांडवली खर्च केवळ 1673 कोटींचा झालेला होता. तर उत्पन्नही तीन हजार कोटींच्या आसपास होते.
उत्पन्नाचे गणित फसले
आयुक्तांनी अंदाजपत्रक स्थायी समितीस सादर केल्यानंतर स्थायी समितीत त्यात बदल करत ते मान्य करते. मात्र, यंदा, महापालिकेची मुदत संपल्याने महापालिका आयुक्तांनी सादर केलेले अंदाजपत्रक अंतिम आहे. मात्र, या अंदाजपत्रकात महापालिका आयुक्तांनी उत्पन्नाचे गृहीत धरलेले आकडे गडगडले आहेत. केवळ शासनाकडून जीएसटी अनुदानापोटी मिळणारे उत्पन्न निश्चित मिळणार असून मिळकतकर, पाणीपट्टी वसुली, कर्ज उभारणे, बांधकाम विकास शुल्क, शासकीय अनुदान, आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे उत्पन्न यात पहिल्या सहा महिन्यांत मोठी तूट आली आहे. मागील वर्षी बांधकाम विभाग तसेच मिळकतकर थकबाकीसाठी अभय योजना सुरू होत्या. त्यामुळे पालिकेस चांगला महसूल मिळाला होता. मात्र, यंदा या दोन्ही विभागांचे उत्पन्न तुलनेने कमी झाले आहे. परिणामी, महापालिकेस यंदाच्या अर्थसंकल्पात अंदाजपत्रकीय तुटीची शक्यता आहे.