भोर -राजगड (ता. भोर) येथील ज्ञानपीठ संचलित अनंतराव थोपटे महाविद्यालयाने पहिल्याच दिवशी बारावीचे ऑनलाइन क्लास सुरू केल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सोमवारी (दि. 15) महाविद्यालयाच्या या क्लाससाठी 56 टक्के विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते, अशी माहिती प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यानी दिली.
ऑनलाइन शिक्षणाबाबत अधिक माहिती देताना डॉ. देखमुख यांनी सांगितले की, ऑनलाइन क्लाससाठी महाविद्यालयामार्फत ज्युनिअर कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांना महाविद्यालयातील संगणक विभागाच्या विषयतज्ज्ञ प्रा. दीपाली धुमाळ (जाधव) यांनी प्रशिक्षण दिले असून, या क्लासचे व्यवस्थापन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ऑनलाइन क्लास सुरू करण्यापूर्वी बारावी सायन्सच्या वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचे दोन व्हॉट्स-ऍप ग्रुप तयार करून त्यांच्यासमवेत ऑनलाइनचे प्रात्यक्षिकही घेतले आहे.
पहिल्या दिवशी प्रा. अरुणा गोडसे, प्रा. बी. एन. मालुसरे आणि प्रा. एस. एन. भोई यांनी आपल्या विषयांचे क्लास घेतले. क्लासच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही देण्यात आली. ग्रामीण भागातील काही विद्यार्थ्यांना स्मार्टफोन आणि इंटरनेटचे स्पीड योग्य प्रकारे मिळत नसल्यामुळे ऑनलाइनला अडचणी येत आहेत.
तरीदेखील त्या अडचणी सोडवून त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न होत आहेत. महाविद्यालयाने पहिल्याच दिवशी ऑनलाइन क्लास सुरू करून बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण योग्य प्रकारे सुरू केले आहे, त्यामुळे राजगड ज्ञानपीठाचे संस्थापक-अध्यक्ष माजी मंत्री अनंतराव थोपटे, कार्याध्यक्ष आमदार संग्राम थोपटे व सचीव डॉ. भाग्यश्री पाटील यांनी प्राध्यापकांचे आणि संगणक विषयतज्ज्ञांचे अभिनंदन केले आहे.