वॉशिंग्टन: अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांच्या प्रचारामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा सहभागी होणार आहेत. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या पहिल्या व्हर्च्युअल निधी संकलनाच्या रॅलीमध्ये ओबामा सहभागी होणार आहेत.
बिडेन यांच्यावतीने ही माहिती प्रसिद्धीस देण्यात आली आहे. ओबामा अध्यक्ष असताना बिडेन हे उपाध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्यात मित्रत्वाचे संबंध आहेत. आपल्या पूर्वीच्या बॉससह आपण पुढच्या आठवड्यात लोकांसमोर येणर आहोत, असे बिडेन यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मे महिन्यात 80.8 दशलक्ष डॉलरचे निधीसंकलन झाले आहे. तसेच सरासरी 30 डॉलरचे ऑनलाईन निधीसंकलन झाले असल्याचे बिडेन यांनी आपल्या सहकाऱ्यांना पाठवलेल्या ई मेलमध्ये म्हटले आहे. पुढील आठवड्यातील निधी संकलनात अल्पप्रमाणात देणग्या देणाऱ्यांकडून दहा हजार डॉलरची देणगी मिळवण्याचे उद्दिष्ट बिडेन यांनी ठेवले आहे.
सिनेटर बर्नी सॅन्डर्स यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ओबामा यांनी बिडेन यांना पाठिंबा जाहीर केला होता. ओबामा यांनी ही निवडणूक आपली आयुष्यभरातील सर्वात महत्त्वाची निवडणूक असल्याचे म्हटले आहे.