भोपाळ – संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेल्या हवाई दलाच्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंह या एकमेव वैमानिकाला तामिळनाडूतील वेलिंग्टनमधील लष्करी रुग्णालयातून बेंगळूरू येथे हलवण्यात आले आहे. वरुण सिंह यांच्या वडिलांनी ही माहिती दिली.
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे वडील निवृत्त कर्नल के.पी. सिंह यांनी फोनवरून वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. ते स्वतः वेलिंग्टनला पोहोचले आहेत. आपल्या मुलाच्या प्रकृतीबाबत आपण आताच काहीही सांगू शकत नाही. आपल्याला आताच काहीही खात्रीलायकपणे सांगता येऊ शकत नसल्याचे, त्यांनी सांगितले.
वरुण सिंह हे निश्चित पूर्ण बरे होती, अशी आशा कर्नल के.पी. सिंह यांचे शेजारी असलेल्या लेफ्टनंट कर्नल इशान आर. यांनी व्यक्त केली. हेलिकॉप्टरचा अपघात घडला तेंव्हा कर्नल सिंह आणि त्यांच्या पत्नी उमा या मुंबईत त्यांच्या धाकट्या मुलाकडे होते. त्यांचा धाकटा मुलगा तनुज नौदलामध्ये लेफ्टनंट कमांडर आहे.
तेथेच या दोघांना या अपघाताची बातमी समजली. वरुण सिंह हे लढवय्ये आहेत आणि ते नक्की बरे होतील, असा विश्वास ले.कर्नल इशान आर. यांनी व्यक्त केला.गेल्या वर्षी तेजस विमानाच्या चाचणी दरम्यान वरुण सिंह अशाच जीवावरच्या अपघातातून बचावले होते. त्यांना याच वर्षी शौर्य चक्र प्रदान करून गौरवण्यात आले आहे.