मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे मिनी युपीएचाच भाग आहे. मात्र युपीएत सामील होण्यासंबंधी शिवसेनेकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. यावरुन भाजपा नेते टीका करत असून त्यांच्या टीकेला संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिले आहे.
शिवसेनेला एकदाचं कॉंग्रेसमध्ये सामील करुन टाका असा सल्ला देणाऱ्या भाजपा नेत्यांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, असे म्हणणारे भाजपचे ते लोक वेडे आहेत आणि त्यांची प्रकृती बिघडली आहे, सर्वांना मानसिक आजार झाला आहे. त्यांच्या रक्ताचीही चाचणी करा असे आपण एनसीबीला सांगू असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी राऊत यांनी खुर्चि उचलल्याच्या त्या फोटोवरूनही बरीच चर्चा सुरू आहे. त्यालाही राऊत यांनी उत्तर दिले आहे. शरद पवार किंवा त्यांच्या वयाचे, उंचीचे नेते या देशात आहेत आणि त्यांना बसायला खुर्ची देणे यामुळे त्रास होत असेल तर तुम्हाला शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. मोठ्यांचा आदर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ज्यांना त्रास आहे, शारिरीक वेदना आहेत त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी जरी तिकडे असते तर मी त्यांनाही मी खुर्ची दिली असती. शरद पवारांची प्रकृती, त्यांचे वय, त्यांना होणारा त्रास आणि ते आंदोलनात माझ्यासोबत आले होते. त्यांना चालतानाही त्रास होत होता.
त्यांना मांडी घालून बसता येत नाही. त्यांच्या पायाला त्रास आहे. अशावेळी महाराष्ट्रातील एका पितृतूल्य, वडिलधाऱ्या व्यक्तीला मी स्वत: खुर्ची आणून दिली हे जर कोणाला आवडलं नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून नवी विकृती आहे, अशी टीका त्यांनी भाजप नेत्यांवर केली.