मंचर – मंचर-बेल्हे रस्त्यावरील एस कॉर्नर येथे मंगळवारी (दि. 9) रात्री कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात वळती (ता. आंबेगाव) येथील एका तरुणाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे.
सचिन शांताराम वाळुंज (वय 31, रा. वळती) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर अशोक वाळुंज असे जखमी झालेल्याचे नाव असून त्यांनीच फिर्याद दिली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सचिन वाळुंज व अशोक वाळुंज हे इंटरनॅशनल स्कूलची कार (एमएच 12 एचएन 6922) घेऊन पार्किंगला लावण्यासाठी वळती येथून मंचरकडे जात असताना एस कॉर्नर येथे चालकाच्या बाजुचे पुढील व मागील टायर अचानक फुटल्याने कार रस्त्याच्या कडेला गेली. यात चालक सचिन वाळुंजहे कारबाहेर पडल्याने त्याच्या डोक्यास मार लागला. त्याला मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पुढील तपास पोलीस जवान सचिन देशमुख हे करीत आहेत. सचिन वाळुंज याचे वडील शांताराम वाळूंज यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. आता या मोठ्या मुलाचे अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, भाऊ, दोन लहान मुले असा परिवार आहे.