करोना नियंत्रणाचे नियम कोंढव्यात मोडीत
कोंढवा – जगभर थैमान घातलेल्या करोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी एकत्र जमण्यावर अधिकाधिक बंधने व सुट्ट्या दिल्या जात असताना कोंढवा उपनगरांत मात्र याबाबत फारसे गांभीर्य दिसत नाही. कारण लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने कोंढवा भागातील मुख्य रस्त्यावरील हॉटेल्स, टपऱ्या व चौकाचौकात मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने करोना नियंत्रणात ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न फोल ठरणार आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनानेच पुन्हा एकदा कडक जमावबंदी अंमलबजावणी करण्यासाठी काठी उगारण्याची गरज आहे.
कोंढवाखुर्द, मिठानगर, शिवनेरीनगर, कोंढवा बुद्रुक, ज्योती चौक, लुल्लानगर चौक, भाग्योदयनगर आदी भागातील नागरिकांना करोनाच्या स्थितीचे फारसे गांभीर्य नसल्याचे निदर्शनास येते. शाळा, महाविद्यालये तसेच वर्क फ्रॉम होमची सुट मिळालेली असताना याचा उपयोग आता मौजमजेसाठी केला जात आहे. यातून सदर भागात मोठी गर्दी होत आहे.
करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यशासन, पालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग विविध उपाययोजना राबवत असताना कोंढव्यात मात्र या प्रयत्नांना छेद दिला जात आहे. त्यामुळे संचारबंदी अंमलात आणून पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेलाच काठी उगारावी लागणार असल्याचे चित्र आहे.