सातारा – कारमधून दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या अक्षय सुरेश शिवगण (वय 24, रा. रविवार पेठ, सातारा) यास शाहूपुरी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्याच्याकडून देशी दारुचे 12 बॉक्स आणि कार पोलिसांनी जप्त केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी सोमवारी (दि. 25) गस्त घालत असताना राधिका सिग्नल ते भूविकास बॅंक चौक या दरम्यान एक जण सिल्व्हर रंगाच्या मारुती झेन कारमधून देशी दारुची चोरटी वाहतूक करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांना मिळाली. त्यांनी सूचना दिल्यानुसार पोलिसांनी रात्री 10 च्या सुमारास पाळत ठेवली. त्यावेळी मारुती कार (एमएच-01-एएन-2624) ही भूविकास बॅंकेकडे जाताना दिसल्यावर पोलिसांनी ती थांबविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, चालकाने कार पुढे नेल्याने पोलिसांनी पाठलाग करून कार नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात अडवली. चालक अक्षय शिवगणला ताब्यात घेऊन पोलिसांनी 31 हजार 680 रुपये किमतीची देशी दारू व कार जप्त केली. पोलीस नाईक सोमनाथ भोसले तपास करत आहेत. सपोनि विशाल वायकर, हवालदार हिम्मत दबडे-पाटील, हसन तडवी, लैलेश फडतरे, सचिन माने, अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते व होमगार्ड खरात यांनी ही कारवाई केली.