मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचे नाट्य काल अखेर थांबले आणि महाविकास आघाडीने सत्तास्थापनेचा दावा केला. दरम्यान, आज सकाळी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी विधानसभेत पार पडत आहेत. त्याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी बंड करून भाजपकडे गेलेले अजित पवार यांच्याविषयी वक्तव्य केले आहे. काका परत येतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
आम्हाला अजित पवार परततील याचा विश्वास होता. जे काही घडले ते कशामुळे घडले, का घडले हे माहित नाही. अजित पवार आमचेच आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते परत येतील याचा विश्वास होता. कुटुंबाचे आहेत म्हणून ते परतल्याचा आनंद झाला त्यापेक्षा अधिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आनंद झाला, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.
तर दुसरीकडे तसेच मी राष्ट्रवादीत होतो, आहे आणि राहणार असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीशी बंडखोरी करत भाजपाशी हातमिळवणी केल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी आपण राष्ट्रवादीमध्येच असल्याचे उत्तर त्यांनी दिले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांवर नाराजी व्यक्त करत आपल्यासंबंधी अनेक चुकीच्या बातम्या देण्यात आल्याची खंत बोलून दाखवली.