पिंपरी, दि. 29 – लहानपणीच डोक्यावरुन आई वडिलांचे छत्र हरपले. परंतु हार न मानता मिळेल ते काम अगदी गवंडी काम करत शिक्षण पूर्ण केले. याच जिद्दीच्या जोरावर कधी काळी गवंडीकाम करणारे संतोष शिवाजी भोसले आज विक्रीकर निरीक्षक बनले आहेत. अनाथ वर्गातून राज्यभरात दुसरा क्रमांक मिळविणाऱ्या संतोष भोसले यांचे पिंपरी-चिंचवडकरांकडून भरभरुन कौतुक होत आहे.
संतोष शिवाजी भोसले असे तरुणाचे नाव आहे. सध्या ते वाल्हेकरवाडी परिसरात राहण्यास आहे. मूळचे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मालगावातील रहिवासी आहेत. आई-वडील शेतमजूर होते. संतोष हे चार वर्षाचे असताना आईने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर पाच वर्षांनी वडिलांचेही निधन झाले. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या संतोष यांचा सांभाळ काकांनी केला. त्यानंतर आठवी, नववी आणि दहावीचे शिक्षण घेत असताना संतोष हे काकांसोबत गवंडी काम करण्यासाठी जात असे. त्यानंतर त्याने एका डॉक्टरच्या हाताखाली कंपाडरचे काम केले. पहाटे उठून तो पेपर टाकण्याचेही काम करीत असे. दहावीमध्ये त्यांनी 75 टक्के गुण मिळविले. मात्र आयुष्यभर आपल्याला गवंडीकाम करायचे नाही हे मनाशी पक्के ठरवित इलेक्ट्रिकल डिप्लोमा केला. त्यानंतर 11 हजार रुपये पगारावर मुंबईत नोकरी मिळाली.
नोकरी करीत असताना संतोषला स्पर्धा परीक्षांबाबत माहिती मिळाली. तसेच पुण्यात या परीक्षांचा अभ्यास करणारे अनेकजण असल्याचे समजतले. दरम्यानच्या काळात संतोषचे लग्नही झाले. सध्या त्यांना पाच वर्षाची मुलगी आहे. कौटुंबिक जबाबदारी अंगावर आल्यावरही अभ्यासात खंड पडू नये म्हणून त्याने साचविलेली गंगाजळी संसारासाठी खर्च करण्यास सुरवात केली. त्यात त्यांच्या पत्नीनेही पतीचे स्वप्न साकार करण्यासाठी घरखर्चात काटकसर केली. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत असतानाच संतोष स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना महिन्यातून चारवेळा मार्गदर्शन करु लागले. त्यातून त्यांना आठ हजार रुपये मिळत होते. मात्र करोनाच्या काळात हे कामही बंद झाले. तरीही संतोषने अभ्यासाची चिकाटी सोडली नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिंचवडगावातील अभ्यासिकेत त्याने प्रवेश घेतला. एमपीएससीच्या ब गटातील परीक्षा दिली. या परिक्षेचा निकाल बुधवारी (दि. 23) रोजी लागला. संतोषची निवड विक्रीकर निरीक्षक म्हणून झाली. ही बाब पत्नीला कळताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. प्रचंड हाल-अपेष्टा काटकसर करुन केलेल्या प्रयत्नांचे चीज झाले होते. मी एमपीएससीच्या ब गटातील परीक्षा पास झालो आहे. तसेच वरिष्ठ पदाची अ गटातील प्राथमिक परिक्षा मी पास झालो असून पुढील मुख्य परिक्षा डिसेंबर महिन्यात होणार आहे. ही परिक्षाही मी देणार आहे.
महापालिकेकडून सत्कार
चिंचवडगावातील स्पर्धा परीक्षा केंद्रात अभ्यास करणारा संतोष भोसले हे एमपीएससी परीक्षेत पास होऊन विक्रीकर निरीक्षक झाले. त्याच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, ब क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ब क्षेत्रीय कार्यालयात संतोषचा सन्मान करण्यात आला. संतोष यांचे हे यश शहरातील तरुणांना मार्गदर्शक ठरेल, असेही जगताप म्हणाले.