पुणे – औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील महापारेषणच्या अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांसाठी नवीन मनोरे उभारणीचे व अन्य दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि. 1 डिसेंबर) सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तसेच रविवारी (दि. 4 डिसेंबर) सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत शिवाजीनगर, डेक्कनमधील काही परिसराचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
गणेशखिंड येथे महापारेषणचे 132 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र आहे. या उपकेंद्राला गणेशखिंड ते चिंचवड आणि गणेशखिंड ते रहाटणी या वाहिन्याद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र या दोन्ही वीजवाहिन्यांचे मनोरे व तारांमुळे औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. तो दूर करण्यासाठी महापारेषण कंपनी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने नवीन मोनोपोल टॉवर उभारण्यात येणार आहे.
त्यामुळे महावितरणच्या 11 केव्ही व 22 केव्ही क्षमतेच्या एकूण 32 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहणार आहेत. यात शिवाजीनगरमधील 28 तर कोथरूड विभागातील 4 वीजवाहिन्यांचा समावेश आहे. त्यामुळे पूर्वनियोजित कामाच्या वेळेत शिवाजीनगर परिसरातील सुमारे 38 हजार 300 तसेच डेक्कन व जंगली महाराज रोड परिसरातील सुमारे 8 हजार 500 ग्राहकांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव बंद ठेवावा लागणार आहे.
वीजपुरवठा बंद राहणारा भाग : फर्ग्युसन रस्ता, वाकडेवाडी, मॉडेल कॉलनी, मोदीबाग, रेंज हिल्स, ई-स्क्वेअर, वडारवाडी, गोखलेनगर, लकाकी रस्ता, सेनापती बापट रस्ता, हनुमाननगर, मंगलवाडी, वेताळबाबा चौक, राजभवन, खैरेवाडी, अशोकनगर, यशवंत घाडगेनगर, पोलीस लाईन वसाहत, घोले रस्ता, शिवाजीनगर गावठाण, कॉंग्रेस भवन, सावरकर भवन, जिल्हा न्यायालय, कामगार पुतळा, तोफखाना, मंगला टॉकीज, आयआयटीएम, कॅस्टेल रॉयल टॉवर, काकडे मॉल, एसएसपीएमएस कॉलेज, रेव्हेन्यू कॉलनी, आकाशवाणी, शिमला ऑफीस, सीआयडी वसाहत, संचेती हॉस्पीटल, लक्ष्मी रस्ता, नारायण पेठ, शनिवार पेठ व सदाशिव पेठचा काही भाग, चित्रशाला, आपटे रस्ता, शिरोळे रस्त्याचा अर्धा भाग, जंगली महाराज रस्ता, पुलाची वाडी, छत्रपती चौक, आयएमडीआर कॉलेज, गणेशवाडी.