लॉकडाऊन टाळण्याचा सल्ला कुठल्या आधारावर? – शिवसेनेचा मोदींना थेट सवाल

मुंबई  – महाराष्ट्रासारख्या राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन हाच पर्याय आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना लॉकडाऊन टाळण्याचा सल्ला दिला. तो सल्ला त्यांनी कुठल्या आधारावर दिला, असा थेट सवाल शिवसेनेने केला आहे.

मोदींनी मंगळवारी रात्री देशाला उद्देशून भाषण केले. देशवासीयांच्या आरोग्याबरोबरच अर्थचक्राचीही काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या पाऊलाकडे अंतिम पर्याय म्हणून पहावे, अशी सूचना त्यावेळी मोदींनी राज्यांना केली. मात्र, ती सूचना शिवसेनेला मान्य असल्याचे दिसत नाही. 

शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून मोदींच्या सूचनेवर एकप्रकारे पक्षाची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात कडक निर्बंध लावूनदेखील करोना नियंत्रणात येत असल्याचे दिसत नाही. गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि कर्नाटकमधील स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. 

गुजरातमध्ये दोन आठवड्यांचा लॉकडाऊन लागू करावा, अशी शिफारस डॉक्‍टरांच्याच संघटनेने केली आहे. अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली जनता रस्त्यावर फिरते आहे. त्यामुळे लॉकडाऊन हीच अत्यावश्‍यक सेवा बनली आहे, अशी भूमिका अग्रलेखातून मांडण्यात आली आहे.

गंभीर परिस्थितीशी सामना कसा करावा याबाबत मोदी जनतेला दिलासा देतील असे वाटत होते. पण, संकट मोठे आहे. तुमचे तुम्ही बघा, हेच त्यांच्या भाषणाचे सार आहे. अशा सारवासारवीने काय होणार, अशी विचारणाही शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.