नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने दबावाखाली मालमत्तांच्या रचनेसाठी आयसीआयसीआय बॅंकेचे माजी अध्यक्ष के. व्ही. कामत यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. कामत यांचा उल्लेख काही तक्रारीत आढळून आला असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने या नियुक्तीवर फेरविचार करावा, असे बॅंक कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.
ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशन या कर्मचारी संघटनेने रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. माध्यमात आलेल्या माहितीनुसार सीबीआयने आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्या विरोधात दाखल केलेल्या एफआयआर मध्ये कामत त्यांचे नाव असल्याचे बोलले जाते.
कोचर यांच्या कालावधीत 1,875 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा अयोग्य पद्धतीने झाला असा आरोप केला जात आहे. कामत बॅंकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष असताना या कर्जाला मंजुरी दिली गेल्याचा आरोप होत आहे.
त्यामुळे दबावाखाली कर्जाच्या फेररचना यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या प्रमुख पदावर कामत यांच्या नियुक्तीची गरज आहे का, यावर रिझर्व्ह बॅंकेने फेरविचार करावा असे आम्हाला वाटते, असे या संघटनेने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
वसुली होत नसलेल्या कंपन्यांच्या कर्जाची फेररचना करण्यासाठी कामात यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेने समिती नेमली आहे. ही समिती आपल्या शिफारशी तीस दिवसांत करणार आहे.