#Video : शिरूर पोलिसांकडून 3 सराईत गुन्हेगारांना अटक

2 पिस्तूल व 3 जिवंत काडतुसांसह 5 लाख 3 हजार रुपयाचा ऐवज जप्त

पुणे – पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक रात्री गस्त घालत असताना त्यांना शिरूर पाषाण मळा येथील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ एक कार दिसली. पोलिसांनी झडती घेतली असता गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेल्या कारमध्ये दोन पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे आढळली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोन पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे, इंडिका कार असा एकूण 5 लाख 3 हजार रुपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी तिघां सराईत गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (17 ऑगस्ट) रात्री 9.30 च्या दरम्यान झाली आहे.

अझहर सफदर खान ( वय 27 रा. शिरूर, भाजीबाजार ता. शिरूर जिल्हा. पुणे ), प्रदीप श्रीकिशन तिवारी ( वय 36 रा.बी. सी. हाऊसिंग सोसायटी, शिरूर  जि. पुणे) आणि सागर रामचंद्र धणापुरे (वय 20 वर्षे रा.सूर्यनगर तपोवन रोड, अहमदनगर) या तीन सराईत आरोपींना बेकायदेशीर घातक शस्त्र वापरल्या प्रकरणी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत ते शिरूर यादरम्यान मोठ्या प्रमाणात तरुणांकडे रिवाल्वर असल्याचे आढळून आले आहे. याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कडक पावले उचलली असून या भागातील बंदूकराज यावर कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस अधिकारी व गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी कारवाई सुरू केली असून काल त्यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, शिरूर  शहराजवळ बाह्य मार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ काही गुन्हेगार गंभीर गुन्हा करण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक बारामती जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, दयानंद लिम्हण, पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, पोलीस नाईक राजू मोमीन, जनार्दन शेळके, बाळासाहेब खडके, प्रमोद नवले या पथकाने संबंधित ठिकाण गाठले. हे पथक शिरूर रिलायन्स पंपाजवळ आले असता शिरूर जवळील भाई या मार्गावरील रिलायन्स पंपाजवळ बातमीदाराने सांगितल्याप्रमाणे त्यांना एक पांढर्‍या रंगाची इंडिका कार उभी असलेली दिसली. यावेळी पोलिस पथकातील पोलीस कर्मचारी इंडिका कार जवळ जात असताना त्यातील दोघेजण पोलिसांना पाहून कारमधून खाली उतरून पळून जाऊ लागले. त्याचवेळी पोलिसांनी त्या दोघा जणांना झडप मारून ताब्यात घेतले व इंडिका कार चालकाला ही ताब्यात घेतले. यावेळी त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे अझहर खान प्रदीप तिवारी व सागर धनापुरे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांचे जवळ बेकायदेशीर बिगर परवाना दोन पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे व  गुन्हा करता वेळेस वापरलेली इंडिका कार एम एच 14 बी आर 65 65 असा एकूण पाच लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला . वरील तिन्ही आरोपींना पुढील कारवाई करता शिरूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले असून त्यांच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार संजय कोलते करीत आहे.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा ते पुण्यापर्यंत तर कोंढापुरी, रांजणगाव औद्योगिक वसाहत शिरूर शहर या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक ठेके घेण्यावरून मोठे वाद आहेत. त्यात येथे आलेल्या युपी बिहारी या तरुणांकडून मोठ्या प्रमाणात रिवाल्वर तस्करी केली जाते. त्यामुळे या भागातील अनेक तरुणांकडे मोठ्या प्रमाणात रिवाल्वर संस्कृती निर्माण झाली आहे. याची गंभीर दखल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी घेतल्यामुळे आजची ही कारवाई झाली असून या कारवाईमुळे पोलीस अधीक्षक संदीप पाटील व गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)