मुंबई – ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी ज्येष्ठ नेते, खासदार प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकृती ठीक नसल्याने गैरहजर होते. यामुळे खडसेंच्या पक्षप्रवेशामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, अजित पवार यांनी ट्विट करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
अजित पवार यांनी एकनाथ खडसेंना प्रक्षप्रवेशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे.
तसेच, खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. खडसेसाहेब, रोहिणीताई खडसे, त्यांच्यासह पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे पक्षामध्ये हार्दिक स्वागत! पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास देतो, असे अजित पवार यांनी म्हंटले आहे.
खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. मा.खडसेसाहेब, मा.रोहिणीताई खडसे, त्यांच्यासह पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांचे पक्षामध्ये हार्दिक स्वागत! पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा,अनुभवाचा निश्चित सन्मान होईल,असा विश्वास देतो.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 23, 2020
खडसे यांच्या प्रवेशानंतर शरद पवार म्हणाले, एकनाथ खडसे यांनी 40 वर्षांपासून भाजप पक्षासाठी मोठे कार्य केले आहे. एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात. परंतु मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने एकनाथ खडसेंना भाजपात सातत्याने डावलले जात होते. एकनाथ खडसे यांनी राज्याच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे. तसेच फडणवीस सरकारमध्ये त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम केल्याचे पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले होते.