fbpx

हद्दवाढीनंतर साताऱ्यात राजकीय पेरणी

उदयनराजेंचा विकासकामांचा, शिवेंद्रसिंहराजेंचा बैठकींचा धडाका

सातारा -सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतर खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आतापासून राजकीय पेरणी सुरू केली आहे. खासदारांनी शुक्रवारी शहरात आठ विकासकामांच्या शुभारंभाचे नारळ फोडले तर हद्दवाढीमुळे शहरात नव्याने आलेल्या शाहूपुरी व शाहूनगर या भागातील पाणीपुरवठा योजनांची कामे मार्गी लागावीत यासाठी आमदारांनी बैठकांचा धडाका लावला होता.

खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आगामी पालिका निवडणुकीसाठी बांधणी सुरू केली आहे. खा. उदयनराजे गटाने आज तब्बल दोन कोटींच्या आठ विकासकामांचे नारळ फोडून सातारा विकास आघाडी सक्रिय झाल्याचे संकेत दिले. यावेळी नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, पक्षप्रतोद निशांत पाटील, बांधकाम समिती सभापती मिलिंद काकडे, स्नेहा नलावडे, ऍड. दत्ता बनकर, मुख्याधिकारी अभिजित बापट, मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील उपस्थित होते.

सातारकरांसाठी ठोस विकासकामे करण्याची खासदार गटाची धडपड आहे. विविध योजनांमधून तीन कोटींच्या विकासकामांना यापूर्वीच मंजुरी देण्यात आली होती. या कामांची सुरुवात करण्याच्या निमित्ताने उदयनराजे यांची पुन्हा संपर्क मोहीम सुरू झाली आहे. उद्या, दि. 24 रोजी सकाळी 11 वाजता दोन रस्त्यांच्या डांबरीकरणाचा शुभारंभ उदयनराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कामांबरोबर स्वीकृत नगरसेवक निवड व उपनगराध्यक्षपद बदलाचेही संकेत आहेत; परंतु उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

दुसऱ्या बाजूला आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठकांचा धडाका लावला होता. कास धरण उंचीसाठी 57 व कण्हेर पाणीपुरवठा योजनेसाठी जादा 12 कोटी रुपये दोन दिवसांपूर्वीच मंजूर करून घेतल्यानंतर त्यांनी शुक्रवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात अभियंता पल्लवी पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी कण्हेर योजनेचे उर्वरित काम सुरू करण्याची सूचना दिली. जमिनीचा ताबा व आवश्‍यक फीडरसाठी प्राधिकरण कार्यालयातूनच महावितरण व वन विभागाच्या कार्यालयाची यंत्रणा त्यांनी हलविली. साताऱ्यात दोन्ही राजे सक्रिय झाले आहेत.

उदयनराजेंचा बेधडकपणा आजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमातही दिसून आला. त्यामुळे भाजपच्या चौकटीला छेद दिला गेला. साताऱ्याच्या आगामी राजकारणात उदयनराजेंच्या धक्कातंत्राबाबत उत्सुकता आहे. शिवेंद्रराजे भाजपमध्ये असले तरी त्यांचे राष्ट्रवादीवरील प्रेम आजही कायम असल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये दिसले आहे. पालिका निवडणुकीसाठी दहा महिनेच आहेत. दोन्ही आघाड्यांमध्ये अंतर्गत नाराजी आहे. शिवाय दोन्ही गटांकडून विकासकामांचा समांतर प्रवास सुरू आहे; परंतु राष्ट्रवादीची साताऱ्यात नाकेबंदी करण्यासाठी दोन्ही नेते पुन्हा एकत्र येणार का, याचे कुतूहल आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.