पुणे शहरात सरासरी 50 टक्‍के मतदान

भाजपच्या बालेकिल्ल्यांतच मतदान टक्‍केवारी घसरली


कसब्यात 9, तर कोथरूडमध्ये 9 टक्‍क्‍यांनी मतदान कमी


मतदान टक्‍केवारी यंदा घसरली

पुणे – शहरात सरासरी 49 ते 50 टक्‍के मतदान झाले असून, मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा ही टक्‍केवारी तब्बल 5 टक्‍क्‍यांनी घसरली आहे. एवढेच नव्हे, तर भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्येच ही टक्‍केवारी 9 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घसरली आहे. पाऊस, सणासुदीचे दिवस आणि एकूणच मतदानातील उदासीनता यामुळे ही टक्‍केवारी घसरल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. केवळ वडगावशेरी मतदार संघात मागील निवडणुकीपेक्षा दीड-पावणेदोन टक्‍क्‍यांनी मतदानाची टक्‍केवारी वाढली आहे.

शहरातील कसबा, शिवाजीनगर, कोथरूड, हडपसर, वडगावशेरी, कॅन्टोन्मेंट, पर्वती आणि खडकवासला या आठ मतदार संघांत मिळून सुमारे 49-50 टक्‍के मतदान झाले. 2014 मध्ये 54 टक्‍के मतदान झाले होते. त्यात यंदा 5 टक्‍क्‍याने घट झाली आहे. फेस्टिव्ह सिझन आणि त्यातून पाऊस याचा परिणाम मतदानावर झाल्याचे बोलले जात आहे. मात्र प्रत्यक्षात मतदारांची उदासीनता यावेळी दिसून आली. वडगावशेरी, पर्वती आणि खडकवासला मतदार संघात अनुक्रमे सर्वाधिक मतदान झाले.

कोथरूड : मतदार संघातील निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. याठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. त्याच मतदार संघातील टक्केवारी सुमारे 9 ते 10 टक्‍क्‍यांनी घसरली आहे. 2014 च्या निवडणुकीत 56.57 टक्के मतदान कोथरूडमध्ये झाले होते.

कसबा : मतदार संघात 2014 मध्ये 61.57 टक्के मतदान झाले होते. मात्र यंदा 52.0 टक्केच मतदान या मतदार संघात झाले. तब्बल 9 टक्‍क्‍यांनी घसरली आहे.

वडगावशेरी : मतदान टक्केवारी यंदा दीड ते पावणेदोन टक्‍क्‍यांनी वाढली आहे. मागीलवेळी ती 54.02 होती, ती यंदा 50.00 झाली आहे.

पर्वती : 55.81 टक्के मतदान 2014 मध्ये झाले होते. यंदा तेदेखील सहा-साडेसहा टक्‍क्‍यांनी घसरले आहे.

खडकवासला : मतदार संघातही सुमारे तीन ते चार टक्‍क्‍यांनी मतदानाची टक्केवारी घसरली असून, मागीलवेळी ती 54.92 होती, यंदा ती 51.00 टक्के आहे.

शिवाजीनगर : मतदार संघात 2014 मध्ये 52.12 टक्के मतदान झाले होते. यंदा ते सात ते साडेसात टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे.

कॅन्टोन्मेंट : येथे 2014 मध्ये 47.24 टक्के मतदान झाले होते यंदा तेही सुमारे सहा टक्‍क्‍यांनी कमी होऊन 43.00 टक्के झाले आहे.

हडपसर : 2014 मध्ये 52.36 टक्के मतदान झाले होते यंदा 47.00 टक्केच मतदान झाले. तब्बल पाच ते सहा टक्‍क्‍यांनी मतदानाची टक्केवारी घसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.