न्यूयॉर्क : करोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनने सगळ्या जगाला धडकी भरली आहे. ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. युरोपमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे स्थानिक संचालक डॉ. हँस क्लूज यांनी दिला आहे.
व्हिएन्नामध्ये करोनाबाधितांविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी क्लूज यांनी ही माहिती दिली. यावेळी, येत्या काही आठवड्यात युरोप आणि अन्य काही देशांमध्ये ओमायक्रॉनबाधितांची संख्या झपाटयाने वाढणार आहे. करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या लाटेमुळे आधीच ताण असलेल्या आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होणार असल्याचे त्यांनी म्हटले.
तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य असलेल्या 38 युरोपीयन देशांमध्ये ओमायक्रॉन आढळला असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिटन, डेन्मार्क आणि पोर्तुगालमध्ये याआधीच ओमायक्रॉनचा जोर वाढला आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, मागील आठवड्यात युरोपीयन युनियनच्या सदस्य देशांमध्ये 27 हजार करोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर, 26 लाख बाधित आढळले आहेत. यामध्ये कोरोनाच्या सर्व व्हेरियंट बाधितांचा समावेश आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या 40 टक्के अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. क्लूज यांनी सांगितले की, करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अधिकाधिक बाधितांना रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनॉम यांनी म्हटले की, नाताळ आणि नवीन वर्षाचे कार्यक्रम रद्द करणे हे जीव धोक्यात घालण्यापेक्षा केव्हाही चांगले आहे. काही कठीण निर्णय घ्यावे लागणार असून त्याअनुषंगाने मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन रद्द करावे किंवा तारीख पुढे ढकलावी. ओमायक्रॉन हा डेल्टाच्या तुलनेत अधिक वेगाने फैलावत असून त्याचे पुरावे असल्याचे त्यांनी म्हटले.