क्रीडारंग : ऑलिम्पिकचे भवितव्य काय ?

-अमित डोंगरे

जागतिक क्रीडाक्षेत्रातील मानबिंदू समजली जाणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा यंदा जपानच्या टोकियो शहरात होत आहे. खरेतर गेल्या वर्षीच ही स्पर्धा होणार होती. मात्र, करोनामुळे ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली. तसे असले तरी अद्याप करोनाचा धोका कायम असल्यामुळे या स्पर्धेबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. या स्पर्धेला जपानमध्येच काही शहरांत कमालीचा विरोध केला जात असून बाकी ठिकाणी स्पर्धेसाठी वातावरणही तयार होऊ लागले आहे. ही संमिश्र परिस्थिती स्पर्धेसाठी अनुकूल नाही, हे जरी खरे असले तरीही वारेमाप खर्च करून ही स्पर्धा भरवण्यात आणि जपानच्या सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर घेत स्पर्धेसाठी निधी उभा करण्याचे षड्‌यंत्र पहिल्यापासूनच मान्य नव्हते. 

आधीच अब्जावधी डॉलर्सचा खर्च करण्यात आला होता. त्यातच स्पर्धा एक वर्ष पुढे गेल्यामुळे पुन्हा एकदा नूतनीकरण, सुविधांची निर्मिती तसेच स्पर्धेशी निगडीत सगळी कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आणखी मोठ्या निधीची आवश्‍यकता आहे. अशा स्थितीत जपानमधील पहिल्यांदा पुढे आलेले प्रायोजकच आता माघार घेत असल्याने स्पर्धेवरील सावट काही केल्या कमी होण्याची चिन्हे नाहीत. या स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यापासूनच देशात ऑलिम्पिकचे वारे वाहू लागले होते. मात्र, या वाऱ्याबरोबरच करोनाचा विषाणूही देशात शिरला आणि जगातील सर्वात मानाच्या स्पर्धेचे आयोजनच धोक्‍यात आले. आता देखील जपान सरकारशी संबंधित मंत्री किंवा महत्त्वाच्या व्यक्‍ती ही स्पर्धा होणारच अशी ग्वाही सातत्याने देत असले तरीही अंतर्गत चित्र निराळेच असल्याचेही समोर येत आहे. त्यातच सामने होत असलेली मैदाने, खेळाडूंसाठी उभारण्यात आलेले क्रीडाग्राम तसेच मैदान व स्पर्धेशी निगडीत सर्व सुविधांची जपणूक व नूतनीकरण यांचा खर्च कसा भागवला जाणार हे अद्याप संयोजकांना स्पष्ट करता आलेले नाही. त्यांची सगळी मदार अद्याप प्रायोजकांवरच आहे.

अब्जावधी डॉलर्स खर्च झालेले असूनही आणखी प्रचंड रकमेची गरज कशी पूर्ण करणार हे अद्याप अनुत्तरीतच आहे. आता स्पर्धेच्या आयोजनातून माघारही घेता येणार नाही आणि स्पर्धा भरवण्यासाठी बक्‍कळ पैसाही जमवता येत नाही अशा कोंडीत जपान सरकार, त्यांची ऑलिम्पिक संघटना उभी आहे. यातून मार्ग कसा काढायचा हेच त्यांच्या आकलन शक्‍तीच्या बाहेरचे आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना सातत्याने जपानला सहकार्य करत असली तरीही ते केवळ राजकीय नेत्यांप्रमाणे तोंडी आश्‍वासन देऊ शकतात, ते पूर्ण करू शकत नाहीत. जागतिक क्रीडा क्षेत्राबाबत बोलायचे झाले तर या ऑलिम्पिकवरचे सावट अद्याप दूर झालेले नसले तरीही पुढील तीन ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद मिळालेले देश तयारीलाही लागलेले आहेत.

करोनाचा धोका जपानमधून पूर्णपणे बाहेर गेला तरीही स्पर्धेच्या आयोजनावर निर्माण झालेले प्रश्‍नचिन्ह कायम राहणार आहे. स्पर्धेला अद्याप पाच महिने बाकी आहेत, आणि जपानमधीलच एक गट स्पर्धा होणार अशी ग्वाही देत आहे तर, दुसरा गट स्पर्धा धोक्‍यात असल्याचे संकेत देत आहे. अशा स्थितीत ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या जगभरातील हजारो खेळाडूूंच्या मनात स्पर्धेबाबतची धाकधूकही वाढली आहे.

स्पर्धा होणार का, हा एकच प्रश्‍न सगळे सातत्याने विचारत आहेत आणि त्यांना अद्याप याचे उत्तर मिळालेले नाही. करोनाचा देशातील धोका कमी होत असल्याचे सरकारी स्तरावर सांगितले जात असले तरीही जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून वेगळेच चित्र समोर येत असून हा धोका अद्याप कायम असल्याचेच दिसून येत आहे. अणुबॉम्बच्या हल्ल्यामुळे झालेल्या विनाशातून फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतलेल्या या उगवत्या सूर्याच्या देशात ऑलिम्पिकचा अरुणोदय होणार का?

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.