क्रीडारंग : देशाला फुटबाॅल देण्याचे परेशचे स्वप्न

– अमित डोंगरे

परेश शिवलकर हे नाव पुण्यातच काय पण राज्य पातळीवर देखील कुणाला नवे राहिलेले नाही. एक फुटबॉलपटू म्हणून जितकी अविस्मरणीय कारकीर्द त्याने गाजवली तितकीच आज एक प्रशिक्षक म्हणून तो यशस्वी ठरत आहे. याच जोडीला त्याने खेळही सुरू ठेवलेला आहे जेणेकरून खेळातील नवनवीन संकल्पना व डावपेच नव्या खेळाडूंना आपल्या अकादमीत शिकवता येतील.

न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड या शाळेतून वयाच्या दहाव्या वर्षी परेशने फुटबॉल खेळायला सुरुवात केली. स्कायहॉक संघाकडून तो पुण्यातील स्थानिक तसेच व्यावसायिक स्पर्धा खेळायला लागला. त्याची 19 वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आणि त्याच्या कारकिर्दीला एक नवीन वळण मिळाले. जिल्हा परिषद, महापालिका, पुणे जिल्हा फुटबॉल संघटना आणि राज्य स्तरावरील संघटना यांनी आयोजित केलेल्या सर्व स्पर्धांमध्ये त्याने आपला ठसा उमटवला. कधी डिफेंडर म्हणून तर कधी ऍटॅकर म्हणून त्याने संघासाठी सातत्याने सरस कामगिरी केली. त्याची ही गुणवत्ता बघून त्याला पुणे सिटी फुटबॉल क्‍लब, बेंगळुरू फुटबॉल क्‍लब यांनी एक खेळाडू म्हणून करारबद्ध तर केलेच पण त्याचबरोबर त्याच्यावर काही वर्षातच प्रशिक्षकाचीही जबाबदारी सोपवली.

तीन वेळा त्याने महाराष्ट्राचे नेतृत्व केले या तीनही वर्षी त्याने वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत राज्याला उपविजेतेपद मिळवून दिले. त्याची डुरॅंड करंडकासाठी देखील करारपात्र खेळाडू म्हणून निवड झाली. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर त्याची भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड झाली. अर्थात, भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे त्याचे स्वप्न जरी पूर्ण झाले नाही तरी त्यानंतर झालेल्या रिलायन्स अखिल भारतीय स्पर्धेत त्याने आपला ठसा उमटवला. या स्पर्धेत भारतीय संघाचा स्टार खेळाडू सुनील छेत्री खेळत असून देखील टॉप स्कोअरर हा किताब परेशलाच मिळाला. या त्याच्या वाटचालीत त्याचे दोन्ही भाऊ आणि त्याची पत्नी यांनी त्याला सातत्याने पाठिंबा दिला.

मुंबईमध्ये गल्फ ऑइलकडून खेळत असताना त्याने स्वतःची अकादमी सुरू केली. या अकादमीत अनेक खेळाडू फुटबॉलमधील कौशल्य शिकण्यासाठी येत आहेत. याच अकादमीने राज्याला अनेक खेळाडू देखील दिले आहेत. स्थानिक स्पर्धांमध्ये त्याच्या अकादमीमार्फत कित्येक खेळाडू आज आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. पुणे सिटी फुटबॉल क्‍लब पुरतीच ही अकादमी नसून येत्या काळात देशाला सर्वोत्तम खेळाडू देण्याचे परेशचे स्वप्न आहे. रोहन फासगे हा या अकादमीचा खेळाडू अखिल भारतीय स्तरावर वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा खेळला. त्याचबरोबर शिवम पेडणेकर आणि विकी राजपूत हे दोघे खेळाडू जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सध्या खेळत आहेत.

भारतात फुटबॉल या खेळाकडे वळणाऱ्यांची संख्या काही वर्षांपूर्वी खूपच कमी होती. त्यातही गोवा, कोलकाता याच शहरांत या खेळाचे वर्चस्व अन्य खेळांपेक्षाही जास्त होते व आहे. क्रिकेटवेड्या आपल्या देशात काही दशकांपूर्वी पर्यंत अनेक फुटबॉलपटू मागे राहिले. मात्र, आज परिस्थिती वेगळी असून नवनव्या स्पर्धांमुळे या खेळाला राजाश्रयाबरोबरच लोकाश्रयही मिळताना दिसतो. खरेतर गेल्या दशकापासूनच भारतातही फुबॉलला प्रेक्षक वर्ग जास्त मिळू लागला. या खेळाच्या केवळ हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्‍याच स्पर्धा खेळवल्या जात होत्या त्यातही आता मोठी वाढ झालेली आहे. इंडियन सुपर लीग फुटबॉलमुळे या खेळाने संपूर्ण देश काबिज केला, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.

भारतातूनही अनेक पुरूष व महिला खेळाडू युरोपातील विविध संघांकडून खेळत आहेत तसेच मोठ्या संख्येने खेळाडू येत्या काळात आणखी वरच्या स्तरावर खेळतील. अर्थात, हे सगळे एका बाजूला ठेवले तर अशीच अपेक्षा करावीशी वाटते की येत्या काळात या खेळालाही प्रायोजकांची रिघ लागलेली दिसली पाहिजे. केवळ क्रिकेटच्या मागे पैशांच्या थैल्या घेऊन जाण्यापेक्षा अन्य खेळालाही पाठिंबा दिला तर त्यातही स्टार खेळाडू नावारूपाला येतील.

पुणे जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित स्पर्धेत या अकादमीचे जवळपास चाळीस खेळाडू वरिष्ठ गटात खेळत आहेत. खूप लहान वयात एक खेळाडू आणि प्रशिक्षक अशी दुहेरी जबाबदारी संभाळणारा परेश शिवलकर हा महाराष्ट्राचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. राज्याला आणि पर्यायाने देशाला आपल्या अकादमीतून खेळाडू देण्याचे ध्येय त्याने ठेवले आहे.

इंडियन सुपर लिग फुटबॉल हे त्याचे पहिले उद्दिष्ट असून या स्पर्धेत अकादमीतर्फे जास्तीत जास्त खेळाडू जर सहभागी झाले तर पुढे जाऊन याच खेळाडूंना भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. परेशचे हे स्वप्न पूर्ण झाले तर देशाला फुटबॉलमधील भविष्य ठरतील असे खेळाडू मिळतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.