दुबई : एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात घरात अडकून बसलेल्या व्यक्तींची सुटका करणे हा एक व्यवस्थापनाचा भाग असला तरी केवळ जास्त वजनामुळे घरातच अडकून बसलेल्या एका महिलेची यशस्वी सुटका करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. तब्बल 400 किलोग्रॅम वजन असणाऱ्या या महिलेला सोळा वर्षानंतर तिच्या घरातून बाहेर काढण्यात आले.
ही घटना जॉर्डनमधील असून जॉर्डनच्या स्थानिक प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने हे सुटका कार्य पार पाडले. जॉर्डन मधील झोरका शहरातील ही घटना आहे.
एका अपार्टमेंटमध्ये ही 400 किलो वजनाची महिला गेली 16 वर्षे राहत होती पण तिच्या स्थूलपणामुळे तिला नॉर्मल आयुष्य जगणे शक्य नव्हते. ती सोळा वर्षे तिच्या घरातच आयुष्य जगत होती. ज्या अपार्टमेंटमध्ये ती राहत होती त्या अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन त्या महिलेला बाहेर काढणे हे एक मोठे आव्हान होते पण स्थानिक पोलिसांनी आणि नागरी प्रशासनाने काळजीपूर्वक ही मोहीम पार पाडून त्या महिलेला त्या घरातून बाहेर काढले.
ही महिला सध्या तेथील नागरी रुग्णालयात उपचार घेत आहे आगामी कालावधीमध्ये या महिलेचे वजन कमी करण्यावर डॉक्टरचा भर असणार आहे. सोळा वर्षानंतर एका घरातून बाहेर पडून बाहेरचे जग अनुभवता आल्याबद्दल या महिलेने स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांचे आभार मानले आहे.