धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात मिळाले पूर्णवेळ सहायक आयुक्क
कात्रज – महापालिका प्रशासकीय स्तरावर करोना विरोधी लढा सुरू असताना धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाची सहायक आयुक्तांची खुर्ची तीन महिन्यांपासून रिकामी होती. मात्र, याबाबत नगरसेवक विशाल तांबे यांनी पत्रव्यवहार करीत या प्रश्नाला वाचा फोडली. अखेर या पदावर निलेश देशमुख या अधिकाऱ्यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे करोनावरील नियंत्रणापासून अन्य उपनगर प्रभागातील सर्व कामे या अधिकाऱ्यामार्फत होण्यास मदत होणार आहे.
शहरात करोनाचे रुग्ण वाढल्यानंतर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयाच्या पातळीवर नियोजन केले आहे. या नियोजनात आयुक्तांपासून सर्वच अधिकारी आहेत. करोना पसरू नये, पसरला तरी त्यावर नियंत्रण कशाप्रकारे ठेवण्यात यावे. यावर विविध उपाय केले जात आहेत, याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयाकडे देण्यात आली आहे.
धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज गेले तीन महिने सहायक आयुक्तांविनाच सुरू होते. प्रभारी अधिकाऱ्यांकडे इतरही कामाची जबाबदारी असल्याने या कार्यालयाचा कारभार पूर्ण वेळ चालत नव्हता. मात्र, आता सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाला पूर्ण वेळ अधिकारी असल्यामुळे प्रलंबीत असलेली कामे वेळेत पूर्ण होतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. याबाबत नगरसेवक विशाल तांबे म्हणाले की, सध्याची परिस्थिती लक्षात घेता अधिकारी नेमण्यात यावेत, असे निवेदन आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे दिले होते. कार्यालयाला पूर्ण वेळ अधिकारी मिळाल्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत होणार आहे.