न्हावरे (वार्ताहर) – कोंढवा (पुणे) येथील करोनाग्रस्त मावशीच्या संपर्कात आलेल्या शिरूर तालुक्यातील कोकडेवाडीच्या एकाच कुटुंबातील १० जणांचे करोना तपासणी अहवाल रात्री (दि.२३) निगेटिव्ह आल्यामुळे संबंधित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे न्हावरे परिसरातील भीतीचे सावट दूर झाले आहे.
संशयितांमध्ये १५ वर्षाच्या मुलापासून वयस्कर व्यक्तींचा सामावेश होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, संशयित सर्व १० जण निगेटिव्ह आल्यामुळे पूर्व शिरूर तालुका करोना मुक्त बनला असून, पूर्व तालुक्यात आताच्या परिस्थितीत एकही करोना रुग्ण नाही. असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी खबरदारी म्हणून मुंबई, पुणे किंवा दूर गावांवरून ग्रामीण भागातील गावांमध्ये आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यासाठी आरोग्य विभागाला मदत करावी. तसेच याबाबतची माहिती कोणीही लपवून ठेऊ नये. संबंधित बाहेरून आलेल्या किंवा गेलेल्या व्यक्तींची माहिती ग्राम प्रशासनाला व आरोग्य विभागाला कळवावी. त्याचप्रमाणे शक्यतो बाहेरच्या लोकांशी संपर्क टाळावा. नागरीकांनी विनाकारण बाहेर जाणेही टाळावे. असे आवाहन शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी प्रभातशी बोलताना केले आहे.