घरमालकावर कारवाई करणार
पुणे – राज्यात काही ठिकाणी डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित घरमालक किंवा हौसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मानवतेच्या दृष्टीने तर हे अत्यंत चुकीचे तसेच नियमबाह्यही आहे. घरमालकांनी आणि सोसायट्यांनी आरोग्य यंत्रणेचे महत्त्व लक्षात घेऊन सहकार्य करावे. अन्यथा, साथरोग नियंत्रण कायद्यानुसार संबंधित घरमालक किंवा हौसिंग सोसायटीवर कारवाई करण्यात येईल, असे शासनाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
करोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हे करताना त्यांना विषाणूची बाधा होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी त्यांच्यामार्फत तसेच प्रशासनामार्फत घेतली जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून इतरांना संसर्गाचा कोणताही धोका नाही. असे असतानाही काही घरमालक, हौसिंग सोसायट्या त्यांच्याकडे भाडेतत्त्वावर राहणारे डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना घर खाली करण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
हे पूर्णतः चुकीचे असून संबंधित घरमालक, हौसिंग सोसायट्या यांनी असे करू नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. एखादे घरमालक किंवा हौसिंग सोसायटी असे करत असल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
पोलिसांशी संपर्क साधा…
भाडेतत्त्वावर राहणारे डॉक्टर, नर्सिंग तसेच रुग्णालयातील कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना घरमालकांकडून तसेच समाजातील अन्य घटनांकडून चुकीची वागणूक मिळत असेल तर स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांच्याकडून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी सूचना परिपत्रकात करण्यात आली आहे.