नगर -करोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन घोषित झाले. सर्वांचेच व्यवसाय बंद झाले. अशा काळात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरातील कायनेटिक चौकात मोठीच आग भडकली. त्या आगीत एक हॉटेल, पंक्चर व भंगाराचे दुकान, एक चहाची टपरी अन् एका सलून व्यावसायिकाचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
नगर महानगरपालिका, व्हीआरडीई अन् एमआयडीसीच्या तब्बल 16 अग्निशमन बंबांनी भडकलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आग आटोक्यात आली, तोवर सर्वच दुकाने जळून खाक झाली. रात्री साधारण साडेआठच्या सुमारास आग लागली. त्यामुळे शर्थीचे प्रयत्न करुनही या सर्वच व्यावसायिकांचे झालेले अर्थिक नुकसान रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरली. त्यानंतरही पुढील तीन दिवस अधूनमधून येथे आग भडकत राहिली. तीन दिवसांनी ही आग पूर्णत: विझली.
दरम्यान, या आगीत सर्वच व्यावसायिकांचे भरून न येणारे अर्थिक नुकसान झाले. त्यात आधीच भाडेतत्त्वावर घेतलेले नीलेश शिंदे या नाभिक व्यावसायिकाचे दुकानही जळून खाक झाले. त्यामुळे कर्ज काढून केलेले फर्निचर अन् व्यवसायासाठी विकत घेतलेले सर्व साहित्यही जळून खाक झाले. घेतलेल्या कर्जाने आधीच मोडलेल्या शिंदे यांच्यावर मोठे अर्थिक संकट ओढावले. आता नव्याने दुकान उभे करण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच शिल्लक नव्हते.
नाभिक समाज महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आगीच्या वेळीच घटनास्थळी धाव घेतली. जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विकास मदने, सुनील वाघमारे, मनोज शिंदे, संजय मदने, जनार्दन वाघ, शरद दळवी, बबन साळुंके, नंदकुमार मोरे, सुनील जाधव यांनी विशेष पुढाकार घेऊन नीलेश शिंदे यांचे सलून दुकान नाभिक समाज महामंडळाच्या लोकवर्गणीतूनच उभे करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी अर्थिक मदत गोळा करुन अवघ्या दोन महिन्यांत शिंदे यांचे सलून दुकान उभे केले. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते व वरील सर्वच पदाधिकारी व नाभिक महामंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत उद्या (दि.3) या सलून दुकानाचे लोकार्पण होत आहे.
राज्यातील सलून व्यावसायिक आधीच खूप अडचणीत आहेत. करोना संकटकाळात व्यवसाय बुडाल्याने अनेक सलून व्यावसायिकांना दोन वेळच्या खाण्याची देखील भ्रांत आहे. अशा काळात नाभिक समाज महामंडळास पुढाकार घेणे क्रमप्राप्त आहे. भविष्यात देखील सलून व्यावसायिकांच्या मदतीसाठी नाभिक महामंडळ तत्पर राहील.
शांताराम राऊत
जिल्हाध्यक्ष, नाभिक समाज महामंडळ, नगर.