वेलिंग्टन : वेगवान गोलंदाज टिम साउदीच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा १० विकेटनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. हा न्यूझीलंडचा १०० वा कसोटी विजय ठरला. या विजयासह न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात ४ व दुस-या डावात ५ विकेट घेणारा टीम साउदी सामन्याचा मानकरी ठरला.
That's that from the Basin Reserve as New Zealand win the 1st Test by 10 wickets and register their 100th Test win.
Scorecard – https://t.co/Jo6w0HOybN #NZvIND pic.twitter.com/N9nxwVH0no
— BCCI (@BCCI) February 24, 2020
न्यूझीलंडने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. भारताने मयंक अग्रवालच्या ३४(८४) आणि अजिंक्य रहाणेच्या ४६(१३८) धावांच्या जोरावर सर्वबाद १६५ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत टिम साउदी आणि काइल जेमीसनने प्रत्येकी ४ विकेट घेतल्या होत्या.
त्यानंतर कर्णधार केन विल्यमसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद ३४८ धावा करत भारतीय संघावर १८३ धावांची मजबूत आघाडी घेतली.
त्यानंतर दुस-या डावातही न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघानी शरणागती पत्करली. दुस-या डावात ट्रेंट बोल्ट (४ विकेट) आणि टिम साउदी (५ विकेट)यांच्या मा-यासमोर भारतीय फलंदाजांची भंबेरी उडाली आणि भारताचा दुसरा डाव १९१ धावसंख्येवर आटोपला. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी ९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. दुस-या डावात मयंक अग्रवालने ५८, अजिंक्य रहाणेने २९ आणि रिषभ पंतने २५ धावा केल्या. याशिवाय एकही फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकला नाही.
विजयासाठीचे ९ धावांचे आव्हान न्यूझीलंडने १.४ षटकांत एकही गडी न गमवता पूर्ण केले. टाॅम लाथमने नाबाद ७ तर टाॅम ब्लंडेलने नाबाद २ धावा करत संघास विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक : भारत : पहिला डाव : ६८.१ षटकांत सर्वबाद १६५( मयंक अग्रवाल ३४, अंजिक्य रहाणे ४६, मोहम्मद शमी २१, रिषभ पंत १९, विराट कोहली २, टिम साउदी ४-४९, काइल जेमीसन ४-३९) आणि दुसरा डाव : ८१ षटकात सर्वबाद १९१ ( पृथ्वी शाॅ १४, मयंक अग्रवाल ५८, चेतेश्वर पूजारा ११, विराट कोहली १९, अंजिक्य रहाणे २९, हनुमा विहारी १५, रिषभ पंत २५, ट्रेंट बोल्ट ४-३९, टिम साउदी ५-६१) विरूध्द न्यूझीलंड : पहिला डाव : १००.२ षटकात सर्वबाद ३४८( केन विल्यमसन ८९, राॅस टेलर ४४, काॅलिन डी ग्रैडहोम ४३, काइल जेमीसन ४४, ट्रेंट बोल्ट ३८, टाॅम ब्लंडेल ३०, इशांत शर्मा ५-६८, रविचंद्रन अश्विन ३-९९, मोहम्मद शमी १-९१, जसप्रीत बुमराह १-८८) आणि दुसरा डाव : १.४ षटकांत बिनबाद ९( टाॅम लाथम नाबाद ७, टाॅम ब्लंडेल नाबाद २).