आता कल कोणाच्या पारड्यात?

हडपसर 213 

मतदारसंघ फेररचनेत 2009 मध्ये कॅन्टोन्मेन्टमधून निर्माण झालेल्या चार मतदारसंघांत हडपसर मतदारसंघाची निर्मिती झाली. एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात मतदारांनी 2009-शिवसेना, 2014 विधानसभा-भाजप, तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपली मतांची बेगमी राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकली. त्यामुळे आता विधानसभेला कोणाला संधी मिळणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे.

2004 पर्यंत जातीय समीकरणांचा परिणाम असलेला हा मतदार संघ गेल्या 15 वर्षांत बहुधर्मिय झाल्याने आता आश्‍वासक चेहरा, विकासकामे, मतदारसंघाला भेडसावणाऱ्या समस्या हे विषय निर्णायक ठरणार आहेत. 2009 मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाची विभागणी झाली. हा पूर्वीचा मतदारसंघ पूर्व पुणे, मुंढव्याचा काही भाग, हडपसरपासून ते दिवे घाट, कात्रज घाट-बोपदेव घाट तसेच धनकवडीच्या काही भागापर्यंत पसरलेला होता. फेररचनेत हडपसर, सध्याचा कॅन्टोंन्मेंट, खडकवासलाचा काही भाग तसेच पुरंदर मतदार संघात विभागणी झाली. त्यावेळी विधानसभेला कॉंग्रेसचे उमेदवार बाळासाहेब शिवरकर यांचा शिवसेनेचे उमेदवार महादेव बाबर यांनी 10 हजार 309 मतांनी पराभव केला.

मनसेकडून नगरसेवक वसंत मोरे यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. 2014 लोकसभा निवडणुकीत हडपसरचा कौल शिरूरसाठी शिवसेनेच्या, तर पुण्यासाठी भाजपच्या पारड्यात राहिला. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेला झाली. पण, त्यावेळी युती आणि आघाडी तुटल्याने पंचरंगी निवडणूक झाली. त्यात भाजपचे योगेश टिळेकर यांनी बाजी मारली. शिवसेनेचे महादेव बाबर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यामुळे हडपसर भाजपचा बालेकिल्ला होत असल्याचे वाटत असतानाच; 2017 मध्ये महापालिका निवडणुकीत मतदारांनी आपला कौल बदलला. या मतदारसंघातून 40 नगरसेवक महापालिकेत गेले. त्यात राष्ट्रवादी-21, भाजप-15, शिवसेना-3, तर मनसे दोघे आहेत. हाच कल लोकसभेवेळी दिसून आला. हडपसरचा बहुतांश भाग असलेल्या शिरूर लोकसभेतून मतदारांनी राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांना संधी दिली. 2014 मध्ये येथून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सुमारे 55 हजारांचे मताधिक्‍य होते. ते 2019 मध्ये 50 हजारांनी कमी झाले. त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला आहे. प्रत्येक निवडणुकीत कौल बदलणारा हा मतदारसंघ आता कोणाला संधी देणार, याचीच चर्चा आहे.

विकासकामे आणि त्यांची पूर्ती हेच महत्त्वाचे विषय
2004 नंतर या भागातून बहुधर्मीय, बहुभाषिक मतदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. 2004 मध्ये सुमारे साडेतीन लाख असलेली मतदारसंख्या 2019 मध्ये 5 लाख 1 हजार 836 वर पोहचली. त्यात परप्रांतिय मतदारही वाढले असून स्थलांतरितांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे हा मतदरसंघ निर्णायक ठरणार आहे. येथील वाहतूक कोंडी, कचरा डेपो आणि नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प, रखडलेले उड्डाणपूल, पाणी या समस्या प्रत्येक निवडणुकीत कळीचा विषय असतात. यंदाही हे मुद्दे तापत असून आता विकासकामे आणि त्यांची पूर्ती करण्यासाठी पुढे येणारा आश्‍वासक चेहरा याच विषयावर आमच्यासाठी महत्त्वाची असल्याचे स्पष्टपणे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.