दीपक पवार हातात बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ

सातारा  – भाजपकडून विधानसभेची उमेदवारी डावलल्याने नाराज झालेल्या दीपक पवारांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या रविवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत सातारा येथे होणाऱ्या मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या निर्णयाची माहिती दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दीपक पवार म्हणाले, 2014 साली मी जावळी तालुक्‍यातून अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेवर निवडून गेलो होतो. त्यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्यास उमेदवार नसताना भाजपने मला आग्रह करून उमेदवारी दिली. अवघे बारा दिवस प्रचार करूनही मी पन्नास हजाराचे मतदान घेतले. सातारा पालिकेच्या निवडणुकीतही दोन्ही राजेंच्या विरोधात भाजपचे बत्तीस उमेदवार उभे करून सहा नगरसेवक निवडून आणले. पाच वर्षे निरपेक्षपणे काम करून 388 बूथ उभे केले. भाजपचे कमळ आम्ही अथक प्रयत्नांती घराघरात पोहोचवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी मला अचानक बोलवून घेऊन पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊ केले. मला महामंडळ नको, विधानसभेचे तिकीट, हवे सांगितले तरीही महामंडळावर जबरदस्तीने नियुक्‍ती करण्यात आले.

या महामंडळावर आठशे कोटीचे कर्ज असून अध्यक्षपदाच्या नेमणुकीचे राजपत्रही प्रसिद्ध झाले नाही. मला फक्त महामंडळाचे गाजर दाखवण्यात आले. “शिवेंद्रराजे हटाव, सातारा बचाव’ हा माझा नारा असून कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी मी राष्ट्रवादीत जात आहे. त्यासाठी पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मी गेलो होतो. त्यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील उपस्थित होते. महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोरच शिवेंद्रसिंहराजे
भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मी राष्ट्रवादीत जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, संपर्कप्रमुख रवी अनासपुरे यांच्याविषयी माझी कोणतीही तक्रार नाही.

साताऱ्यात उमेदवारीची अदलाबदल
2014 साली विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राष्ट्रवादीचे तर दीपक पवार हे भाजपचे उमेदवार होते. मात्र, गेल्या काही दिवसांत राजकीय संदर्भ झपाट्याने बदलले. शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून दीपक पवार हे राष्ट्रवादीत निघाले आहेत. यावेळच्या निवडणुकीत शिवेंद्रराजे हे भाजपचे उमेदवार असतील तर दीपक पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)