ग्रामपंचायतींनंतर जिल्हा परिषद, पंचायतींचे वाजणार बिगुल?
विशाल भालेराव
खडकवासला – जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा कालावधी संपल्यानंतर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. सध्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. परंतु पुणे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह नगरपालिका आणि नगरपंचायतीवर सध्या प्रशासकराज आहे. त्यामुळे ग्रामपंचयतींचा बिगुल वाजला यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निर्णयाकडे आता सगळ्यांचा नजरा लागल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांबरोबर नगरपालिकेच्या सदस्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे याठिकाणी प्रशासक आहेत. यापूर्वी मे 2020 ते मार्च 2022 मध्ये मुदत संपलेल्या गट आणि गणाच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचेही नियोजन करण्यात आले होते. मात्र, ओबीसी आरक्षण तसेच राज्यातील सत्ताबदल आदी घटनांमुळे निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या. आता पुन्हा या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन सगळ्यांच्या नजरा आता पुन्हा निवडणूक आयोग कधी निवडणुका जाहीर करणार याकडे लागल्या आहेत.
हवेली तालुक्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), वंचित बहुजन आघाडी, मनसे, एमआयएम, रिपाइंचे विविध गट, वंचित आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, बसपा, समाजवादी पक्ष, मुस्लिम लिग आदी पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार ग्रामपंचायत निवडणुकीतून चाचपणी सुरू केली आहे.
त्याचबरोबर इच्छुकांनी देखील पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या आहेत. आपल्यालाच पक्षाची उमेदवारी मिळावी, यासाठी समर्थकांमार्फत फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. त्यादृष्टीने आपआपल्या भागात होणाऱ्या विविध कार्यक्रमांना देखील इच्छुक आवर्जून हजेरी लावत असल्याचे चित्र सध्या हवेली तालुक्यात दिसून येत आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारधारेला मानणारा आहे. यापूर्वी केलेल्या विकासकामांच्या जोरावर खडकवासला विधानसभा मतदारसंघातील जनताही राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे. यापुढे तालुक्यातील उर्वरित विकासकामांचा डोंगर उभा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सदैव तत्पर आहे.
– नवनाथ पारगे, माजी सदस्य जिल्हा परिषद पुणे
सज्जनांसाठी ढाल आणि दुर्जनांवर वार करायला तलवार ही छत्रपती शिवाजी महाराज यांची निशाणी आम्हाला मिळाली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लढवण्यास आम्ही सज्ज झालो आहोत .
– रमेश कोंडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेबांची शिवसेना