ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांकडून जोरदार तयारी
लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सहा प्रभाग व 17 सदस्य संख्या असलेल्या या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता असून करोडोंचा धुराळा उडणार आहे.
दि. 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. कदमवाकवस्तीसह हवेली तालुक्यातील सात गावांत निवडणूक होणार आहे. कदमवाकवस्तीतील इच्छुकांनी आधीच तयारी सुरु केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम, देवदर्शन, स्पर्धात्मक कार्यक्रम घेतले गेले आहेत. सोशल मिडीयाद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा इच्छुकांचा प्रयत्न सुरू आहे.
प्रत्येक वॉर्डातील इच्छुकांची संख्या सध्या तरी 10 ते 15 च्या घरात आहे. सुमारे 18918 मतदार संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीसाठी धुरळा उडणार आहे. मावळते सत्ताधारी गटाचे प्रमुख चित्तरंजन गायकवाड व माजी सरपंच नंदू पाटील काळभोर, उपसरपंच बाबासाहेब काळभोर, माजी उपसरपंच ऋषीकेश काळभोर यांच्या नेतृत्वाखालील मुख्य दोन पॅनेलमध्ये ही निवडणूक होणार असल्याची चर्चा आहे.
एक दोन प्रभागामध्ये तिसरी आघाडी होण्याची शक्यता काही इच्छुकांनी व्यक्त केली. सरपंचपद इतर मागासवर्गीय पुरुष प्रवर्गासाठी राखीव आहे. अतिशय प्रतिष्ठेची व खर्चिक अशी निवडणूक होणार असल्याची चर्चा सध्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू आहे.
मागच्या निवडणूकीत 2017 साली लोकनियुक्त सरपंच निवड झाली होती. त्यावेळी सरपंचपदी चित्तरंजन गायकवाड यांच्या पत्नी गौरी गायकवाड निवडून आल्या होत्या. त्या निवडणुकीत हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष व माजी सरपंच नंदू काळभोर यांचे लोकसेवा पॅनेल व भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांचे परिवर्तन पॅनेल यांच्यामध्ये समोरासमोर लढत झाली.
या लढतीत परिवर्तन पॅनेलने सरपंचपद व चौदा जागा मिळवल्या. तर लोकसेवा पॅनेलचे तीन उमेदवार विजयी झाले होते. गोगलवाडी, अहिरे, बुर्केगाव, कदमवाकवस्ती, आव्हाळवाडी, पिंपरी सांडस व पेरणे हवेली तालुक्यातील या सात ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे.