सेऊल – निवडणुका आल्यानंतर राजकीय पक्ष, उमेदवारांकडून आश्वासनांचा पाऊस पाडला जातो. निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या राजकीय पक्षांकडून अनेक आश्वासने दिली जातात. सध्या दक्षिण कोरियात याचा प्रत्यय येत असून केस गळतीचा मुद्दा प्रमुख झाला आहे. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ली जे-म्युंग यांनी केस गळतीच्या उपचारासाठी सरकार मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ली जे-म्युंग यांनी या आठवड्यात केस गळतीच्या मोफत उपचाराची घोषणा केली होती. त्यानंतर हा मुद्या आता चर्चेत आला आहे. मागील निवडणुकीत उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम, अमेरिकेसोबतचे संबंध, आर्थिक घोटाळे, आर्थिक समस्या आदी मुद्दे चर्चेत होते.
जे म्युंग म्हणाले, हेअर ट्रान्सप्लांटचा खर्च हा राष्ट्रीय आरोग्य विम्यातून केला पाहिजे. म्यूंग यांनी सोशल मीडियावर केस गळतीच्या उपचारासाठी, हेअर ट्रान्सप्लांटसाठी एक चांगले धोरण बनवणार असल्याची घोषणा केली.
या घोषणेचे टक्कल असणाऱ्या अनेकांनी स्वागत केले आहे. तर, मते मिळवण्यासाठी कोणत्याही लोकप्रिय घोषणा करण्यात येत असल्याची टीका विरोधकांनी केली. सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटले. अनेकांनी म्युंग यांच्या घोषणेचे स्वागत करताना म्हटले की, टक्कल असणाऱ्या, केस गळतीने त्रस्त झालेल्या लोकांच्या भावना कोणीतही समजून घेतल्या आहेत. दक्षिण कोरियात पहिल्यांदा टक्कल असणाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण असल्याचे युजर्सने म्हटले आहे.