आढळाराव पाटील यांनी खडवाडीतील नुकसानीची केली पाहणी
पारगाव शिंगवे – खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे रविवारी (दि. 26) झालेल्या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पहाणी शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी थेट बांधावर जाऊन केली. तसेच आंबेगाव व शिरूर तालुक्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतातील शेतकर्यांना शासनाकडून मदत करण्याचे प्रयत्न करणार, असे सांगितले.
आंबेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी प्रामुख्याने खडकवाडी, वाळुंजनगर, लोणी, धामणी, वडगाव पीर, कुरवंडी, कारेगाव या परिसरामध्ये गारपीट व अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होऊन झालेल्या शेतकर्यांच्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व तहसीलदार संजय नागटिळक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावे याबाबत सूचना केल्या. मुख्य म्हणजे अनेक शेतकर्यांनी कमी क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात पीक घेतले असून पंचनामे हे वस्तुस्थितीला आधारभूत मानून योग्यरित्या करण्यात यावे, असे आढळराव पाटील यांनी सांगितले.
आंबेगावच नव्हे तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध भागात मोठ्या प्रमाणात वादळी वार्यासह जोरदार पाऊस होऊन झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झालेला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी (दि. 28) मंत्रालय, मुंबई येथे भेट घेऊन तातडीने मदत मिळण्याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी आग्रही मागणी करणार असल्याचे शेतकर्यांना सांगून आश्वस्त केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले, खडकवाडी गावचे माजी सरपंच अनिल डोके व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
या पिकांचे नुकसान
आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतातील बटाटा, कांदा रोपे व लागवड झालेली कांदा पीक, पालेभाज्या, जनावरांचा हिरवा चारा, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर लोणी धामणी परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट होवून शेतात सर्वत्र गारांचा खच दिसत होता.