पुणे – नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय विषयाच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्याच अनुषंगाने आता सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाने पुढील शैक्षणिक वर्षापासून अर्थशास्त्र, धोरणनिर्मिती, वैद्यकीय उपकरणे, कृषी अभियांत्रिकी या विषयातील अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुधीर आगाशे, कुलसचिव प्रा. नरेंद्र सोनावणे, “केपीएमजी’ सल्लागार संस्थेचे नारायणन रामास्वामी या वेळी उपस्थित होते. भविष्यवेधी परिवर्तनाच्या दृष्टीने केपीएमजी या सल्लागार संस्थेची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठीचा सहकार्य करार करण्यात आला.
तर, पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटसोबत बोलणी सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सीओईपी या संस्थेने आता उच्च स्तरावर जाण्याची गरज आहे. त्यासाठी “केपीएमजी’ची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील पाच वर्षांच ही परिवर्तनाची प्रक्रिया राबवण्यात येईल. क्रमवारीतील स्थान उंचावणे, संशोधनाला चालना देण्यासह संस्थेचा पूर्वीचा लौकिक परत मिळवण्याचे उद्दिष्ट आहे, असे डॉ. चौधरी म्हणाले.
महाविद्यालय ते विद्यापीठ या प्रवासानंतर आता पुढे काय करायचे यासाठी दिशा मिळणे आवश्यक आहे. केवळ विद्यार्थी संख्या वाढवण्याच्या मागे न लागता देशाला आवश्यक असलेले काम झाले पाहिजे. त्यामुळे राज्य आणि राष्ट्रीय पातळीपुरते मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तराचे लक्ष्य ठेवून काम करण्याचा निर्णय नियामक मंडळाने घेतला. याकामी आवश्यकतेनुसार राज्य सरकार, माजी विद्यार्थ्यांनाही जोडून घेण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. आगाशे यांनी सांगितले. चिखली येथील संकुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. या संकुलात आठ उत्कृष्टता केंद्राची निर्मिती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘इंटरनॅशनल सेंटर’चीही होणार स्थापना
राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवण्यासाठी सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाने भविष्यवेधी परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत विद्यापीठासमोरील अडचणी आणि समस्यांचा अभ्यास करून त्यावर कालबद्ध पद्धतीने उपाययोजना करण्यात येणार असून, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून “सीओईपी इंटरनॅशनल सेंटर’चीही स्थापना करण्यात येणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.