पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप वेतनामध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे. सात हजाराने ही वाढ केली असून, इंटर्नशिप विद्यार्थ्यांना आता ११ नव्हे तर १८ हजार रूपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये राज्यातील शासकीय व अनुदानित वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतन वाढीबाबत चर्चा झाली.
या विद्यार्थ्यांना पूर्वी ११ हजार रूपये विद्यावेतन दिले जात होते. मात्र, नवीन निर्णयानुसार फेब्रुवारी २०२४ पासून दरमहा १८ हजार रुपये देण्यात येईल. तसेच, परदेशातून वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांनाही हेच वेतन असेल, असा निर्णय घेण्यात आला आहे.