विद्यार्थ्यांना ज्येष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे, नितीन ठाकरे, पवन गरांडे, प्रतीक गावडे, अजित रेपेकर, राकेश वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी दोन प्रकारे मूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण दिले. शिल्पकारांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास तयार करून सुबक मूर्ती करण्यासाठी विशेष सहकार्य केले.
कर्वेनगर येथील मिलेनियम नॅशनल स्कूल, बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, टिळक रस्त्यावरील डीईएस सेकंडरी स्कूल, सिंहगड रस्त्यावरील ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपरी-चिंचवड येथील श्री शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालय, प्रियदर्शनी स्कूल, पी. के. इंटरनॅशनल स्कूल या शाळांतील विद्यार्थ्यांनी मूर्ती साकारल्या.
हरवत चाललेले मूर्तीकाम पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळाली. सुरुवातीला माती हाताळताना विद्यार्थ्यांच्या मनात संकोच होता. मात्र, काही वेळानंतर विद्यार्थी मूर्ती साकारण्याच्या प्रक्रियेमध्ये रममाण झाले. वर्गातील मित्रमैत्रिणींबरोबर मूर्ती तयार करण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. बालशिक्षण मंदिर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून मूर्ती साकारण्याचा आनंद द्विगुणित झाला होता. एका मातीच्या गोळ्यातून साकारलेल्या सुबक मूर्तीमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.
केवळ यावर्षीच नव्हे तर पुढील अनेक वर्षे शाडू मातीची मूर्ती साकारून घरी प्राणप्रतिष्ठा करणार असल्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी या निमित्ताने केला.