विधानसभा निवडणूक : सात महिलांचा समावेश; आठही मतदारसंघातील इच्छुकांची गर्दी
सातारा – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाल्याने भाजपने जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून 58 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये 51 पुरूष व सात महिला इच्छुक उमेदवारांचा समावेश होता. आमदार रवी असोले यांच्या उपस्थितीत सातारा विश्रामगृहात या मुलाखती पार पडल्या.
या मुलाखतीचा अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाने प्रत्येक जिल्ह्यात इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या मुलाखती घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक प्रभारी प्रदेश कार्यालयातून पाठवण्यात आले आहेत.
रवी असोले, संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत मुलाखतींचे सत्र पार पाडले. सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तयारी म्हणून प्रदेश कार्यालयाकडून आमदार अनिल सोले यांनी सर्व आठ मतदारसंघांतील भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या भेटी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना मतदारसंघातील त्यानी केलेली कामे, मतदारसंघातील समस्या आणि आमदारकीची उमेदवारी का पाहिजे, या संदर्भाने इच्छुकांची चाचपणी करण्यात आली. सदस्यांकडून मतदारसंघप्रमाणे शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, गट, गण, प्रभाग माहिती अनिल सोले यांनी घेतली. त्यानंतर मतदारसंघनिहाय मुलाखती झाल्या. मतदारसंघनिहाय मुलाखत दिलेल्या इच्छुकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
कोरेगाव ः महेश शिंदे, संतोष(भाऊ) जाधव, विवेक (अप्पा) कदम, रणजित फाळके, प्रभाकर साबळे, रमेश माने, सौ. सुवर्णा राजे. कराड उत्तर ः मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, सयाजीराव पाटील, विश्वासराव सावंत, हिंदूराव चव्हाण, रामचंद्र चव्हाण, सागर शिवदास. सातारा ः शिवेंद्रसिंहराजे भोसले, दीपक पवार, अमित कदम, संतोष(भाऊ) जाधव, अभय पवार, सौ. स्मिता निकम, सौ. सुनिशा शहा. वाई ः मदन भोसले, चंद्रकांत काळे, मोनिका धायगुडे, अविनाश फरांदे, प्रशांत जगताप, रामदास शिंदे, दीपक जाधव, सचिन घाडगे, प्रदीप क्षीरसागर, शैलेंद्र वीर, दिनकर शिंदे. माण ः डॉ. दिलीप येळगावकर, बाळासाहेब मासाळ, अनिल देसाई, सचिन गुदगे, महादेव कापसे. पाटण ः भरत पाटील, कविता कचरे, सुरेखा तुपे, नानासाहेब सावंत, रामचंद्र लाहोटी, दीपक महाडिक, सागर माने, नितीन जाधव. कराड दक्षिण ः जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, डॉ. अतुल भोसले. फलटण ः सौ. स्वप्नाली शिंदे, रावसाहेब क्षीरसागर, मिलिंद काकडे, शैलेंद्र कांबळे, सुधीर अडागळे, राजेंद्र काकडे, नयना भगत, राज सोनावले, विश्वनाथ शिंदे, वसंत निकाळजे, संदीपभाऊ शिंदे.
फलटण तालुक्यात सर्वाधिक इच्छुक
फलटण तालुक्यातून सर्वाधिक अकरा उमेदवारांनी मुलाखती दिल्या. तर वाई तालुक्यात अकरा जणांनी विधानसभा लढण्याची तयारी दर्शवली. फलटणमधून स्वप्नाली शिंदे यांच्या उमेदवारी अर्जाची चर्चा झाली. माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे व साताऱ्याचे नगरसेवक मिलिंद काकडे यांनीही राजकीय आखाडयात उतरण्याचे मनसुबे स्पष्ट केले. साताऱ्यातून शिवेंद्रसिंहराजे भोसले, दीपक पवार, अमित कदम, संतोष जाधव, अभय पवार, स्मिता निकम, सुनिशा शहा यांनी मुलाखती दिल्या.
…तर आमचा उमेदवाराला विरोध
“आमच ठरलयं,’ म्हणत आमदार जयकुमार गोरे यांना रोखण्यासाठी चंग बांधलेले डॉ. दिलीप येळगावकर व अनिल देसाई यांनी मुलाखतीच्या दरम्यान परखड मते मांडली. आमदारकीचा राजीनामा देऊन जयकुमार गोरे भाजपच्या तंबूत दाखल होत आहेत. असे झाल्यास आम्ही गोरेविरोधात प्रचार करणार, असा पवित्रा घेतल्याने माण खटाव विधानसभा मतदारसंघातील आंतरविरोध स्पष्टपणे समोर आले.दीपक पवार- शिवेंद्रराजे आमनेसामने
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत “शिवेंद्रसिंहराजे हटाव’चा नारा देणारे दीपक पवार व शिवेंद्रसिंहराजे भोसले अगदीच आमनेसामने बसले होते. मात्र दीपकबापूंच्या “आमदार हटाव’ मेळाव्याच्या संदर्भाने कोणतीच चर्चा झाली नाही. दोघांनीही एकमेकांकडे बघण्याचे टाळले.