लोणंदला अपघातामध्ये युवकाचा जागीच मृत्यू

लोणंद – लोणंद येथे सातारा रस्त्यावरील आंबेडकर चौकात रस्त्यावर थांबलेल्या कार चालकाने कारचा दरवाजा उघडल्याने पाठीमागून आलेली मोटारसायकल दरवाजाला धडकून मालट्रकखाली गेल्याने मोटारसायकलस्वार अलंकार अशोक भिसे (वय 18 रा. अंदोरी, ता. खंडाळा) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद लोणंद पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली असून ट्रकचालक व कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी ः गुरुवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास लोणंद गावच्या हद्दीत निरा सातारा जाणाऱ्या रोडवर आंबेडकर चौकाजवळ अलंकार भिसे मोटारसायकलवरून (एमएच 11 एक्‍यू 6409) सातारा बाजूकडे जात असताना रोडच्या डाव्या बाजूस थांबलेल्या कारच्या चालकाने कारचा उजव्या बाजूचा दरवाजा उघडला. त्या दरवाजाची धडक अलंकार भिसे याच्या मोटारसायकला बसली.

अलंकार रस्त्यावर पडला. या सर्वांची त्याचवेळी सातारा बाजूकडे निघालेला मालट्रक (एमपी 09 एचजी 4756) याने मोटारसायकलस्वारास पुढील बाजुची धडक दिल्याने अलंकार मालट्रकच्या पुढील डावे बाजूच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला.

त्याला पोलिसांच्या मदतीने व तेथे जमलेल्या लोकांनी एका रुग्णवाहिकेमधून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता डॉक्‍टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी कारचालक व मालट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार यशवंत महामुलकर करत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.