आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेणार; अजित पवारांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

पुणे – शहरासह ग्रामीण भागांत करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोना रुग्णांची संख्या वाढल्याने बेड अपुरे पडत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज सर्वपक्षीय नेत्यांची महत्वाची बैठक आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.

काय म्हणाले अजित पवार?

आज पुण्यात बैठक आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेऊन चालणार नाही, असे महत्वपूर्ण वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.

आज बारामतीत बैठक घेऊन इंजक्शन, बेड, लसीकरण, रुग्णवाहिका याचा आढावा घेतला. बारामतीत होत असलेली वाढ रोखण्यासाठी काही निर्बंध लादण्याबद्दल पोलिस यंत्रणेला सूचना दिल्या आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

राज्य शासनाच्या एकाही हॉस्पिटलमध्ये इंजक्शन कमी पडत नाही. खासगी रुग्णालयांमध्ये तुटवडा आहे. त्यामागे काही कारणे आहेत. त्याबद्दलही चर्चा करण्यात आली आहे. जिल्ह्यात याबद्दल कशा पद्धतीने उपाययोजना राबवायच्या याबद्दल पुण्यातील बैठकीत निर्णय घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

तसेच, आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उद्यापासून दुकाने उघडण्याच्या भूमिकेबद्दल चर्चा केली जाईल.व त्याबद्दल आज रात्री किंवा उद्या निर्णय जाहीर केला जाईल, असेही अजित पवार यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, सद्यस्थितीत विकेंड लॉकडाऊन उपयोगाचा नसून तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करावाच लागेल, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही शुक्रवारी म्हंटले होते. त्यामुळे, लवकरच राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.