पुणे – मराठा समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना नोटीस बजावली आहे. मुंबई येथे एका मेळाव्यात भावना दुखावणारी केलेली वक्तव्ये तत्काळ मागे घेऊन मराठा समाजाची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
थेरंगाव येथील सतीश काळे यांनी ऍड. अतुल पाटील यांच्यामार्फत ही नोटीस जावली आहे. ते पिंपरी चिंचवड शहर संभाजी ब्रिगेड अध्यक्ष आहेत. मराठा आरक्षणाची मागणी जातीच्या किंवा व्यक्तीविरुद्ध नाही. असे असतानादेखील भुजबळ दोन समाजांत तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करत आहेत. 14 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची कुचेष्टा करणारी, मराठा समाजाच्या भावना दुखावणारी वक्तव्ये केली.
“तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री असून तुम्ही मंत्री पदाच्या शपथेचादेखील भंग करत आहात. त्यामुळे समता परिषदेच्या मेळाव्यात भाषण करताना अंतरवली सराटी येथील सभेबद्दल कुचेष्टा करणारी वक्तव्ये त्वरित मागे घेऊन मराठा समाजाची माफी मागावी, अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू करू,’ असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.