नगर – अनधिकृत नळजोड असणारे महापालिका मालमत्ताधारक महापालिकेच्या रडारवर येणार आहेत. खासगी संस्थेमार्फत शहरातील नळजोडांची मोजणी करण्यात येणार आहे. नळजोड मोजणीच्या कार्यवाहीनंतर पाणीपट्टीच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ होईल, अशी माहिती ,महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.
शहरातील मालमत्तांची संख्या सव्वा लाखापेक्षा अधिक असून त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या अधिकृत नळजोडांची संख्या मात्र अवघी 62 हजार इतकीच आहे. दिवसेंदिवस शहराचा विस्तार होत आहे. नवीन इमारतींची संख्या वाढत आहे. मात्र, त्याप्रमाणात नळजोडांची संख्या वाढताना दिसत नाही आहे. शहरात हजारो नळजोड अनधिकृत असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.
दंडात्मक कारवाई करून हे अधिकाऋत नळजोड अधिकृत करण्याचे प्रयत्न महापालिकेने यापूर्वी अनेकदा केले. परंतू या प्रयत्नांना यश आले नाही. अनधिकृत नळजोडांची संख्या वाढतीच आहे. त्यामुळे खासगी संस्था नेमूण शहरातील सर्व नळजोडांची मोजणी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी खासगी ठेकेदार संस्थाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.
लवकरच हि कार्यवाही पूर्ण होऊन नळजोड मोजणीचे काम सुरु होणार आहे. मोजणी करताना अनधिकृत नळजोड आढळल्यास दंडात्मक कारवाई करून नळजोड अधिकृत करण्यात येणार आहे. त्यामुळे नळजोड मोजणीनंतर मालमत्तांच्या प्रमाणात नळजोडांची अधिकृत संख्या महापालिका प्रशासनाला कळणार आहे. या कारवाईमुळे महापालिकेच्या उत्पन्नात भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे.
शहरातील नळजोडांची मोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. महापालिकेने निविदा जाहीर केल्या आहे. प्रतिसाद भेटेल तसे पुढे काम चालू होईल.
परिमल निकम, पाणीपुरवठा विभागप्रमुख