सिनेमे आणि वेबसिरीज रिलीज झाल्यानंतर त्याबद्दल वाद निर्माण होणे ही काही नवीन गोष्ट नाही. आता पूजा भटची “बॉम्बे बेगम्स’ ही नवीन वेबसिरीज देखील वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ही वेबसिरीज ताबडतोब थांबवण्यात यावी, अशी नोटीस बाल हक्क आयोगाने नेटफ्लिक्सला पाठवली आहे.
ही वेबसिरीज पूजा भटची आहे आणि वेबसिरीजमध्ये आध्या ही पूजा भटची सावत्र मुलगी म्हणून दाखवली गेलेली आहे. त्यामध्ये आध्या आनंद ही 13 वर्षांच्या शाळकरी मुलीच्या रोलमध्ये असणार आहे. शाळेतल्या मुली आपल्या अंगांबाबत उघड चर्चा करताना आणि फोटो काढताना दाखवले गेलेले आहे.
याशिवाय 13 वर्षाच्या एका मुलीला सिगारेट ओढताना, दारु पिताना आणि ड्रग्ज घेतानाही दाखवले गेलेले आहे. काही अल्पवयीन मुलांना कॅज्युअल सेक्स करतानाही दाखवले गेलेले आहे. “बॉम्बे बेगम्स’ 8 मार्चला नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे.
वेगवेगळ्या सामाजिक श्रेणी आणि वयातील 5 महिलांची ही कथा आहे. या पाच जणींमध्ये पूजा भट, अमृता सुभाष, शहाना गोस्वामी, प्लबिता बोरठाकूर आणि आध्या आनंद आहेत. याशिवाय राहुल बोस देखील लीड ऍक्टर आहे. “लिप्स्टिक अंडर माय बुरखा’ चे डायरेक्शन करणाऱ्या अलंक्रिता श्रीवास्तव यांनी “बॉम्बे बेगम्स’चे शुटिंग केले आहे.